मुंबई : मारुती अल्टो ही देशात सर्वाधिक विक्री झालेली चारचाकी गाडी आहे. २०१७-१८ मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या गाड्यांमधल्या टॉप १० गाड्यांपैकी ७ मॉडेल हे मारुतीचेच आहेत. वाहन निर्माता संघटन सोसायटी ऑफ इंडियानं ही यादी जाहीर केली आहे. २०१७-१८ या वर्षामध्ये ६.९९ टक्के वाढीसह २,५८,५३९ गाड्यांची विक्री झाली. त्याआधी मागच्या आर्थिक वर्षामध्ये २,४१,६३५ अल्टो विकल्या गेल्या होत्या.
मारुती सुझुकीची नवीन कॉम्पॅक्ट सिडान डिझायर ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. या आर्थिक वर्षामध्ये १,९६,९९० डिझायर विकल्या गेल्या. याआधीच्या वर्षी डिझायर टूरच्या १,६७,२६६ गाड्यांची विक्री झाली होती. तिसऱ्या क्रमांकावर मारुती नेक्सा बलेनो आहे. बलेनोची यावर्षी १,९०,४८० मॉडेल विकली गेली. मागच्या वर्षी या गाडीची १,२०,८०४ मॉडेल विकली गेली होती. चौथ्या क्रमांकावर नवीन लॉन्च झालेली हॅचबॅक स्विफ्ट आहे. या गाडीची १,७५,९२८ मॉडेल विकली गेली. पाचव्या क्रमांकावर मारुती सुझुकी वेगन आर आहे. वेगन आरची १,६८,६४४ मॉडेल विकली गेली.
हुंडई मोटरची ग्रँड आय १० २०१७-१८ या वर्षात सहावी सर्वाधिक विक्री झालेली गाडी आहे. आय १० ची १,५१,११३ मॉडेलची विक्री या आर्थिक वर्षात झाली. सातव्या क्रमांकावर मारुतीची एसयूव्ही व्हिटारा ब्रिझा आहे. ब्रिझाची एकूण १,४८,४६२ मॉडेलची विक्री झाली. हुंडई आय २० या यादीत आठव्या क्रमांकावर असून १,३६,१८२ युनिटची विक्री झाली. हुंडईची एसयूव्ही क्रेटा नवव्या क्रमांकावर आहे. क्रेटाच्या १,०७,१३६ गाड्या विकल्या गेल्या. दहाव्या क्रमांकावर मारुतीचं आणखी एक मॉडेल होतं. या गाडीच्या ९४,७२१ मॉडेलची विक्री झाली.