Maruti Suzuki Price Hike: भारतीय ऑटो क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये मोठी प्रगती झाली असून, ग्राहकांच्या मागण्या आणि देशातील रस्त्यांच्या स्थितीसह अनेकांचाच प्राधान्यक्रम लक्षात घेता कारनिर्मात्या कंपन्यांकडून त्याच धाटणीच्या कार उत्पादनांना प्राधान्य देण्यात आलं. या शर्यतीत मारुती सुझुकीसुद्धा मागे नाही. पण, सध्या मात्र या कंपनीच्या एका निर्णयामुळं ग्राहकांना धक्का बसू शकतो.
आर्थिक क्षमता आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेता भारतामध्ये सर्वाधिक पसंती मारुती सुझुकीच्या वाहनांना दिली जाते. पण, आता मात्र कंपनीकडून नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच कारच्या दरवाढीसंदर्भातील घोषणा केली आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं 2025 पासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. या अधिकृत माहितीनुसार येत्या वर्षात कारच्या किमती 4 टक्क्यांपर्यंत वाढवल्या जाणार आहेत.
वाढता उत्पादन खर्च, एक्सचेंज रेट, वाढता लॉजिस्टीक खर्च या कारणांमुळं कंपनीकडून कारच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार 1 जानेवारीपासून मारुतीच्या सर्व वाहनांमध्ये दरवाढ केली जाणार असून प्रत्येक मॉडेलनुसार ही दरवाढ लागू असेल. कारच्या एक्स शोरुम दरांमध्ये ही वाढ केली जाणार असून, नेमक्या कोणत्या कारच्या किमती वाढणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
थोडक्यात नव्या वर्षात कार खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांचं आर्थिक गणित कंपनीच्या या एका निर्णयामुळं गडबडणार असून, काहींना तर बजेटअभावी या स्वप्नावर पाणीही सोडावं लागू शकतं. कार खरेदीमध्ये कर्जही मोठी भूमिका बजावतं. ज्यामुळं आता कंपनीकडून नेमके कोणत्या कारचे दर वाढवले जातात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.
हल्लीच मारुती सुझुकीकडून भारतीय बाजारात डिझायर या सेडान कारचं फोर्थ जनरेशन मॉडेल लाँच करण्यात आलं. या कारची प्रारंभिक किंमत 6.79 लाख रुपये इतकी सांगण्यात आली. याशिवाय पुढच्याच वर्षी कंपनी पहिली इलेक्ट्रीक कार लाँच करण्यासाठी सज्ज असून वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 17 जानेवारीला भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये ही कार सादर करण्यात येईल.