मुंबई : स्वस्त डाटा आणि फ्री कॉलिंग सुविधेसाठी ओळखली जाणारी आणि टेलिकॉम इंडस्ट्रीत धम्माल उडवून देणाऱ्या 'रिलायन्स जिओ'नं आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचं प्लानिंग सुरू केलंय. 'जिओ इन्फोकॉम'नं विमान प्रवासादरम्यान कनेक्टिव्हिटी लायसन्ससाठी दूरसंचार विभागासमोर अर्ज दाखल केलाय. लायसन्स मिळाल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर भारतीय तसेच परदेशी एअरलाइन्सला कनेक्टिव्हिटी आणि डाटा सर्व्हिस उपलब्ध करून देऊ शकतील. त्यामुळे तुम्हाला विमानप्रवासातदेखील इंटरनेट वापरण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे.
कंपनीनं नुकत्याच जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, कंपनीकडे सध्या ३० करोड युझर्स आहेत. या सुविधेचा फायदा रिलायन्स जिओच्या सर्व अर्थात ३० कोटींहून अधिक ग्राहकांना घेता येईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेसाठी जिओशिवाय ओर्टस कम्युनिकेशन्स, स्टेशन सॅटकॉम आणि क्लाऊड कास्ट डिजिटल यांसहीत आणखीन काही कंपन्यांनी दूरसंचार विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी रिलायन्स जिओला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यास कंपनीनं नकार दिलाय.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय वायु क्षेत्रात उड्डाण सेवांसोबत समुद्रातही मोबाईल फोन सेवांसाठी दिशानिर्देश नोटिफाईड करण्यात आली होती. त्यानंतर भारती एअरटेल, हग्स कम्युनिकेशन इंडिया तसंच टाटानेट सर्व्हिसेसनं लायसन्ससाठी अर्ज दाखल केले होते.