ChatGPT अकाऊंट झाले हॅक; हजारो भारतीयांच्या डेटाची चोरी

ChatGPT Account : सायबर सिक्युरिटी सोल्यूशन फर्म ग्रुप-आयबीने म्हटले आहे की मोठ्या संख्येने चॅटजीपीटी युजर्सचे तपशील हॅक केले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक भारतीय युजर्सच्या डेटावर परिणाम झाला आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 24, 2023, 05:11 PM IST
ChatGPT अकाऊंट झाले हॅक; हजारो भारतीयांच्या डेटाची चोरी title=
(फोटो - freepik.com)

ChatGPT Account Hack : चॅट जीपीटी (ChatGPT) लाँच झाल्यापासूनच त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. जगभरातील लोक त्याचा विविध प्रयोगांसाठी वापर करत आहेत. यावर अकाऊंट (ChatGPT Account) तयार करून लोक चॅटबॉटचा वापर आपल्या कामासाठीही करत आहेत. दुसरीकडे सायबर गुन्हेगारांचेही (Cyber Crime) याकडे लक्ष्य गेलं आहे. हॅकर्सनी चॅट जीपीटीचा गैरवापर करण्याचा मार्गही शोधून काढला आहे. ग्रुप-आयबीच्या अहवालानुसार सुमारे 1,00,000 लोकांचे चॅट जीपीटी अकाऊंट हॅक होऊन त्यातील माहिती लीक झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये भारतातील बहुतेक युजर्सना याचा फटका बसला आहे.

सिंगापूरस्थित सायबर सिक्युरिटी फर्मने दावा केला आहे की त्यांना 1,01,134 असे डिव्हाईस सापडली आहेत ज्यात चॅट जीपीटी क्रेडेन्शियल सेव्ह केले होते आणि हॅकर्सने ते हॅक केले आणि ते डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवले होते. या अहवालामुळे सायबर विश्वात एकच खळबळ उडाली आहे. ग्रुप-आयबीच्या थ्रेट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मनुसार, मालवेअरद्वारे लोकांचा डेटा हॅक करून डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. यासोबतच आशिया पॅसिफिकमध्ये चॅट जीपीटी वापरणाऱ्या युजर्सच्या अकाऊंटसोबत छेडछाड करण्यात आली आहे. एकूण हॅक केलेल्या क्रेडेन्शियल्सपैकी 40,999 आशिया-पॅसिफिक प्रदेशातील, 24,925 मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील, 16,951 युरोपमधील आणि 12,314 लॅटिन अमेरिकेतील आहेत. 

या अहवालात असे म्हटले आहे की भारतात सर्वाधिक 12,632 खाती हॅक झाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे ज्याची 9217 खाती हॅक झाली आहेत. ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 6531 खाती हॅक झाली आहेत. ही चोरी झालेली माहिती डार्क वेबवर विकली गेली. या घटनेमुळं चॅटजीपीटी सारख्या एआय प्लॅटफॉर्मचे नियमन करण्याचे आवाहन करणाऱ्या एलॉन मस्क यांच्यासह अनेक तंत्रज्ञान तज्ञांच्या संशयाला बळ मिळाले आहे.

डेटाचा होऊ शकतो गैरवापर

चॅट जीपीटीची ओळख झाल्यानंतर बहुतेक लोक त्यांच्या कामात त्याचा वापर करत आहेत. चॅट जीपीटी लोकांचे प्रश्न आणि हिस्ट्री जतन करून ठेवते. अशा परिस्थितीत हॅक झालेल्या खात्यांचा डेटाही त्यांच्या खात्यात सेव्ह होतो. हॅकर्स या डेटाचा गैरवापर करू शकतात. जेव्हा एखादे अकाऊंट हॅक केले जाते, तेव्हा कंपनी किंवा व्यावसायिकांचा संवेदनशील डेटा चुकीच्या हातात जाण्याचा आणि त्या डेटाचा गैरवापर होण्याचा धोका असतो. याचा वापर करून कंपनी आणि कर्मचाऱ्यांना टार्गेट करता येते.