पुणे: फर्ग्युसन महाविद्यालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी अभिनेते शरद पोंक्षे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी झाल्याचा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी महाविद्यालयात ‘मी सावरकर’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज पार पडला. यावेळी शरद पोंक्षे यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
मात्र, या कार्यक्रमापूर्वी पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात जमत शरद पोंक्षे यांच्याविरोधात घोषणबाजी करायला सुरुवात केली. देश गोडसेवादी की गांधीवादी', 'गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंचा जाहीर निषेध', असे फलकही यावेळी झळकावण्यात आले. त्यामुळे हा कार्यक्रम होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.
मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळीही प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर देत उपस्थित स्वयंसेवकांनी देखील घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सरकार स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी सरकार वाट का पाहत आहे, असा थेट सवाल उपस्थित केला. सावरकरांना भारतरत्न दिल्यास तो भारतरत्न पुरस्काराचा सन्मान ठरेल. मात्र, त्यापूर्वीच सावरकरांना भारतरत्न म्हणायला सुरुवात करा, असे आवाहन पोंक्षे यांनी केले.