China on New Parliament Building: चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र समजलं जाणारं वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने (Global Times) भारताच्या नव्या संसद भवन इमारतीचं (New Parliamentary Building) कौतुक केलं आहे. तसंच नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. भारताने वसाहती युगाच्या सर्व खुणा पुसत असल्याचं चीनने वृत्तपत्रात म्हटलं आहे. भारताची नवी संसद इमारत उपनिवेशीकरणचा महान प्रतीक होईल अशा शब्दांत चीनने स्तुती केली आहे. भारताचा विकास व्हावा अशी चीनची इच्छा असल्याचंही वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे.
"भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं आहे. ब्रिटीश वसाहतीदरम्यान उभारण्यात आलेली जुनी संसद इमारत आता संग्रहालयात रुपांतरित होणार आहे. नव्या संसद भवनाला मोदी सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचा मुख्य भाग मानण्यात आलं आहे. याचा उद्देश भारताच्या राजधानीला गुलामीच्या प्रतिकांमधून मुक्त कऱणं आहे," असं वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे.
वृत्तपत्रात नरेंद्र मोदींच्या भाषणाचा दाखला देत नवी संसद फक्त इमारत नाही तर आत्मनिर्भर भारताच्या उदयाचा साक्षीदार होईल असा उल्लेख आहे.
चीनने नव्या संसद भवनाच्या विशेष गोष्टींचा उल्लेख करत म्हटलं आहे की, "ही इमारत उभारण्यासाठी 12 कोटी डॉलर खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये मोर, कमळ, वडाचे झाड अशा राष्ट्रीय प्रतिकांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रतीक भारताचा इतिहास आणि संस्कृतीचं महत्व दर्शवतात. हा भारताच्या उपनिवेशीकरणचा महत्त्वाचा भाग असून एक महान प्रतीक ठरेल".
"मोदी सरकारने गेल्या काही वर्षात भारताची प्रतिमा सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. भारताची ही प्रतिमा उपनिवेशीकरणाला वाढ आणि स्वातंत्र्यावर जोर देते," असं वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे. चीन भारताचं स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा कायम ठेवण्याच्या इच्छेला पाठिंबा देत आहे. इंग्रजांनी जवळपास 200 वर्षं भारतावर राज्य केलं असून त्यांची ओळख मिटवणं मोठं काम आहे असं चीनने म्हटलं आहे.
1986 मध्ये भारत सरकारने नवी दिल्लीमध्ये इंडिया गेटसमोर असणारा किंग जॉर्ज पंचमचा पुतळा हटवला होता. यानंतर 8 सप्टेंबर 2022 मध्ये मोदी सरकारने महाराणी एलिजाबेथ द्वितीयच्या निधनानंतर इंडिया गेटसमोरील राजपथाचं नाव बदलून कर्तव्यपथ दिलं होतं असं चीनने सांगितलं आहे.
भारताला विकासाचं आपलं लक्ष्य गाठण्यात यशस्वी व्हावा अशी चीन प्रार्थना करत आहे. तसंच एक मित्र म्हणून आपल्यात कटुता निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देत आहे. अमेरिकेने आधीच फूट पाडा आणि राज्य करा धोरणाच्या माध्यमातून राज्य केलं असून अजूनही त्याचाच वापर करत आहे असं चीनने म्हटलं आहे. अमेरिका आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करु शकतं असा इशाराही चीनने भारताला दिला आहे.