नवी दिल्ली - खासगी कंपनीतील नोकरी आणि टार्गेट हे आता एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. कोणत्याही खासगी कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना टार्गेट दिले जाते. हेच टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून कंपनीतील वरिष्ठांनी तुम्हाला शारीरिक शिक्षा केल्याचे सहसा ऐकिवात येत नाही. पण चीनमधील एका कंपनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे शिक्षा दिली जाते, याचे छातीत धडकी भरवणारे चित्रच पुढे आले आहे. चीनमधील एका कंपनीने टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर रांगायला लावण्याची शिक्षा दिली. काही दिवसांपूर्वीच असाच एक प्रकार पुढे आला होता. त्यामध्ये टार्गेट पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्यांना थप्पड मारण्यात येत होती. अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे कंपनीतील टार्गेट, ते पूर्ण करण्याचा दबाव किती भयानक झाला आहे, याचा प्रत्यय येतो.
चीनमधील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ चीनमधील शेनडोंगचा आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस हातात झेंडा घेऊन पुढे चालत असल्याचे दिसते. त्याच्या मागे काही लोक रांगत रांगत जात आहेत. जेव्हा पोलिसांनी हा सगळा प्रकार पाहून आक्षेप घेतला. त्यावेळी कर्मचाऱ्यांची शिक्षा थांबविण्यात आली. संबंधित कंपनी काही महिन्यांसाठी बंद करण्यात आली होती, अशीही माहिती तपासात पुढे आली आहे. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांना रांगेत थांबवण्यात आले असून, एक महिला त्यांना थप्पड मारत असल्याचे दिसले होते.
कर्मचाऱ्यांना रस्त्यावर रांगायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारे स्वतःच्या कर्मचाऱ्यांचा अपमान करणाऱ्या कंपनीला टाळे ठोकले पाहिजे. केवळ नोकरीसाठी कर्मचारी आत्मसन्मानाशी कसे काय खेळू शकतात, असा प्रश्न लोकांकडून विचारण्यात आला आहे.