Corona News : जगभरातून कोरोना (Corona) काढता पाय कधी घेणार असा प्रश्न पडत असतानाच आता पुन्हा एकदा या संसर्गाबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. (WHO) जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अधनोम घेभ्रेसस यांनी ही माहिती देत संपूर्ण जगाला सावध केलं.
मागील आठ आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गामुळं 1.70 लाख जणांनी जीव गमावला. एका अहवालातून याबाबतची माहिती समोर आली असली तरीही, मृतांचा आकडा आणखी मोठा असेल ही बाब त्यांनी स्पष्ट केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन इमरजेन्सी कमिटीच्या निरीक्षणानुसार प्राणी आणि मनुष्यामधून कोरोनाचा नायनाट करणं जवळपास अशक्य आहे. या विषाणूच्या संसर्गाच्या भयावह रुपापासून आपण दूर येऊ, मृतांची संख्याही कमी करु इतकंच काय तर अनेकांना याची लागण होण्यापासून वाचवू पण, येत्या काळातही कोरोना Global Emergency असेल. थोडक्यात कोरोनाला हद्दपार करणं जवळपास अशक्यच असल्याची बाब जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केली आहे.
आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार सध्या कोरोनाशी संपूर्ण जग दोन हात करत आहे. या संसर्गाला अद्यापही तितक्याच गांभीर्यानं विचारात घेतलं जात असल्यामुळं इतर आजारपणं आणि रोगांच्या प्रादुर्भावावर लक्ष देणं आव्हानात्मक ठरत आहे. या साऱ्याचा ताण थेट जगभरातील आरोग्य यंत्रणांवर आल्याचं सांगत आरोग्य संघटनेकडून सध्याच्या घडीला आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांपासून वैद्यकिय सुविधांचा तुटवडाही जाणवत असल्याचा मुद्दा अधोरेखित केला.
Last Friday the @WHO Emergency Committee met to consider whether #COVID19 remains a Public Health Emergency of Intl. Concern. In their view, the outbreak remains a global health emergency, and I agree. This morning, I updated the #EB152 on the way forward. https://t.co/LNH6n5s0jd pic.twitter.com/p0QTo0mV1S
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) January 30, 2023
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेनं कमी झाला असल्या तरीही त्याला हलक्यात घेण्याची चूक अजिबातच करु नका असंही WHO च्या प्रमुखांनी बजावलं. वेळोवेळी कोरोनानं आपल्याला धक्का दिला आहे, ज्यामुळं येणाऱ्या काळात वैद्यकिय सुविधांसोबतच अनेक अद्ययावत गोष्टींचीही मदत आपल्याला लागेल अशी शक्यता वर्तवत पुढल्या कैक पिढ्यांपर्यंत कोरोनाचा नायनाट होणार नाही हाच मुद्दा जाणीवपूर्वकपणे प्रकाशात आणला.