बिजिंग : आता एक इंटरेस्टिंग बातमी. चीनच्या एका शक्तिशाली दुर्बिणीनं परग्रहावरील सजीवांचा शोध घेतल्याचा दावा केला गेलाय. तर दुस-या एका संशोधकानं याच्याही पुढे जात सापासारखे एलियन्स पृथ्वीवर ताबा मिळवण्याच्या खटपटीत असल्याचं म्हटलंय. (fact check china telescope detected signs of life)
परग्रहावरील सजीव किंवा एलियन्स हा कायमचा कुतुहलाचा विषय. त्याबाबत जगभरात संशोधन होत असतं. आता चीनच्या शक्तिशाली स्काय टेलिस्कोपला एलियन्सचे काही पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आलाय.
चीनचा 'तियानआन' हा जगातील सर्वात शक्तिशाली सिंगल अॅपर्चर टेलिस्कोप मानला जातो. 'तियानआन' या मॅड्रियन शब्दाचा अर्थ 'स्वर्गाचा डोळा' असा आहे. या 'डोळ्या'नं अंतराळातील काही विशिष्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल पकडले असून त्याद्वारे परग्रहावरील सृष्टीचा दावा करण्यात आलाय.
चीनची सरकारी वेबसाईट 'सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेली'वर हा शोधनिबंध प्रसारित करण्यात आला होता. मात्र शास्त्रज्ञ झांग टोंजिए यांचा हा निबंध कालांतरानं हटवण्यात आला. वेबसाईटवरून संशोधन हटवण्याचं कारण स्पष्ट नसलं तरी तत्पूर्वी चीनसह जगभरात सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झालीये.
दुसऱ्या एका स्वतंत्र संशोधनात तर यापेक्षा धक्कादायक दावा करण्यात आलाय. दुस-या ग्रहावरील सरपटणारे एलियन्स हे पृथ्वीवर कब्जा करण्यास प्रयत्नशील असल्याचं ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवलेले एक्झोपॉलिटिक्स तज्ज्ञ डॉ मायकल सल्ला यांनी केलंय.
सापासारखे दिसणारे हे एलियन्स ग्लोबल वॉर्मिंगबाबत चिंतित आहेत. त्यामुळे जगातील राजकारणावर नियंत्रण मिळवून ते पृथ्वीवर ताबा घेऊ शकतात, असा सनसनाटी दावा सल्ला यांनी केलाय.
अर्थात अद्याप एलियन्स असल्याचं सिद्ध करणारा एकही सबळ पुरावा मिळालेला नाही. मात्र त्याबाबत असलेलं कुतुहल स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच असे नवनवे दावे केले जातात.