लग्नही होतं अन् हनिमूनही... मात्र चार दिवसातच होतो घटस्फोट; कुठे फोफावतोय Pleasure Marriage चा ट्रेंड

What Is Pleasure Marriage : फक्त आनंद आणि गरजा भागवण्यासाठीचं लग्न... कुठे फोफावतोय हा डोकं चक्रावणारा ट्रेंड? पाहा सविस्तर वृत्त   

सायली पाटील | Updated: Oct 5, 2024, 12:44 PM IST
लग्नही होतं अन् हनिमूनही... मात्र चार दिवसातच होतो घटस्फोट; कुठे फोफावतोय Pleasure Marriage चा ट्रेंड  title=
pleasure marriage new trend arises in indonesia travel news

What Is Pleasure Marriage : प्रपोज मॅरेज, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, अरेंज कम लव्ह मॅरेज, लव्ह कम अरेंज मॅरेज असे एक ना अनेक प्रकार सांगत लग्न या नात्याची व्याख्या मांडली जाते. प्रत्येकासाठी ही व्याख्या तितकीच वेगळी असते. किंबहुना जगभरात लग्न या संकल्पनेभोवतीसुद्धा अनेक संकल्पना गुंफल्या गेलेल्या असतात. सध्या याच विवाहपद्धतीमध्ये एक असाही ट्रेंड रुजताना दिसत आहे, जो प्रथमदर्शनी अनेकांच्याच पचनी पडणंही कठीण. कारण, जिथं लग्न म्हणजेच पती- पत्नीनं एकमेकांना आयुष्यभरासाठी दिलेली साथ, असं अलिखित समीकरण असतं. तिथंच एका देशात लग्नाकडे आनंद आणि गरज भागवण्याची तरतूद म्हणून पाहिलं जात आहे. हा नेमका काय प्रकार आहे, हे जाणून अनेकांनाच धक्का बसतोय. 

Los Angeles Times नं नुकताच जगासमोर आणलेला हा प्रकार आहे, 'प्लेजर मॅरेज'. एका उदाहरणासह हा सर्व प्रकार समोर आला असून, यामध्ये उपलब्ध माहितीनुसार एका 50 वर्षीय व्यक्तीनं 17 वर्षांच्या मुलीसोबत गेस्टरुममध्येच लग्न केलं. मुलीकडून इथं तिची थोरली बहीण उपस्थित राहिली. या व्यक्तीनं लग्नासाठी 850 डॉलर म्हणजेत साधारण 71384 रुपये इतकी किंमत मोजली होती. त्यानं लग्नासाठी रक्कम दिली होती, मागितली नव्हती ही बाब भुवया उंचावणारी. 

लग्नानंतर ही जोडी एका रिसॉर्टवर गेली. तिथं त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध झाले, ही मुलगी तिथं कधी त्या व्यक्तीसाठी जेवण बनवत होती, कधी टीव्ही पाहत होती, तर कधी फरशी पुसत होती. पाचव्या दिवशी त्या व्यक्तीनं मुलीला 'तलाक' देऊन तो सौदी अरब येथे निघून गेला. सहसा अशा लग्नांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं म्हणतात पण, इंडोनेशियामध्ये हा ट्रेंड 'प्लेजर मॅरेज' म्हणून ओळखला जातो. या लग्नांमध्ये एजंटही असतात. 

लॉस एंजेलिस टाईम्सच्या माहितीनुसार वरील मुलीनं कोणालाही तिचं खरं नाव सांगितलं नाही. तिनं जितक्या पुरूष पर्य़टकांशी लग्न केलं त्या सर्वांना तिनं ‘Cahaya’ हेच नाव सांगितलं असून, आतापर्यंत तिची अशी 15 लग्न झाली आहेत. या मुलीशी लग्न करणारे बहुतांश पुरुष मध्य आशियायी देशातील असल्याचं सांगितलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : बाळाला दूध पाजायचं असेल तर, घरी जा! ऐकताच 'तिने' Breastfeed करतानाचा Photoच व्हायरल केला आणि...

 

लग्नाची ही तात्पुरत्या स्वरुपातील तजवीज समजली जात असून, इंडोनेशियातील Puncak या डोंगराळ भागामध्ये हे उदरनिर्वाहाचं एक माध्यम समजलं जात आहे. इथं ही प्रथा इतकी प्रचलित झालीय की या भागातील गावांना 'घटस्फोटित गावं' (divorcee villages) म्हणून ओळखलं जातं. इंडोनेशियामध्ये देहव्यापाराप्रमाणं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बेकायदेशीर आहे. पण, इथं या कायद्याचं कठोर पालन होत नसल्यामुळं दलाल, रिक्रूटर, कॉन्ट्रॅक्टर असं एक जाळंच सध्या प्रचंड प्रमामात पसरल्याचं दिसत आहे. 

अधिकृत वृत्तानुसार जकार्ता येथील Syarif Hidayatullah Islamic State University च्या प्राध्यापक यायान सोपयान यांच्या माहितीनुसार इंडोनेशियामध्ये अशी अनेक शहरं आहेत जिथं सध्या ही कुप्रथा प्रचलित असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांकडून या लग्नांना प्राधान्य दिलं जातं. कोरोना काळात इथं परिस्थिती आणखी बिघडल्याचंही म्हटलं जात आहे. अनेक ठिकाणी मुली घरकामाची नोकरी करतात असं कुटुंबांना भासवलं जातं, प्रत्यक्षात मात्र त्या 'प्लेजर मॅरेज'च्या जाळ्यात अडकलेल्या असतात. जिथं पतीही असतो, लग्नही असतं अन् 4 ते 5 दिवसांचा संसार आणि त्यानंतर होणारा घटस्फोटही असतो हे दाहक वास्तव!!!