PM Modi America Speech: भारतातील प्रत्येक रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषण कलेचे चाहते पाहायला मिळतात, पण गुरुवारी रात्री उशिरा पंतप्रधान मोदींनी अमेरिकन संसदेला संबोधित केले. यावेळी परिसरातील वातावरण 'मोदीमय' झाले होते. मोदींचा प्रभाव अमेरिकन खासदारांवर दिसून आला. त्यांच्या ५८ मिनिटांच्या भाषणात, 'मोदी-मोदी'च्या घोषणा देत खासदार 15 वेळा उभे राहिले तर त्यांनी 79 वेळा टाळ्या वाजविल्या. भाषण संपल्यानंतरही मोदींचा ऑटोग्राफ घेण्यासाठी खासदारांनी गर्दी केली होती. तसेच एखादा हॉलिवूड सेलिब्रिटी असल्यासारखा त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा उत्साह होता.
यादरम्यान अमेरिकेच्या संसदेला दुसऱ्यांदा संबोधित करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान बनले. मोदींनी भारताच्या वर्तमान ते भविष्यातील धोरणाची रूपरेषा यावेळी सर्वांसमोर मांडली. दहशतवाद, शांतता आणि आर्टिफिशिल इंटेलिजन्स या विषयांपासून ते सध्याचा भारत काय आहे? हे स्पष्टपणे सर्वांना सांगितले.
अमेरिकेच्या संसदेचे आभार मानून पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात केली. अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणे हा सन्मान आहे, असे ते म्हणाले. भारतातील १.४ अब्ज लोकांच्या वतीने मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या भाषणात त्यांनी भारत-अमेरिका संबंधांबाबत आपले धोरणही सर्वांसमोर स्पष्ट केले. ते म्हणाले, आजच्या तारखेत एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) बद्दल खूप चर्चा होत आहे. माझ्या मते AI म्हणजे अमेरिका आणि भारत. ते म्हणाले, भारत आणि अमेरिकेवर महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग यांचा प्रभाव आहे.
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या खासदारांना भारतातील विविधतेची माहिती दिली. ते म्हणाले, आमच्या येथे 2500 पक्ष आहेत. 22 अधिकृत भाषांसह हजारो बोली. दर 100 मैलांवर अन्न बदलते. गेल्या वर्षी आपण ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. हजारो वर्षांच्या परकीय राजवटीनंतर आपण स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. हा केवळ लोकशाहीचा उत्सव नव्हता तर विविधतेचाही उत्सव होता, असेही ते म्हणाले.
दहशतवादाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान आणि चीनचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, दहशतवाद चांगला आणि वाईट नसतो. दहशतवाद फक्त वाईटच आहे. ते म्हणाले, मुंबईतील 9/11 हल्ला आणि 26/11 च्या हल्ल्याला एक दशक उलटले तरी कट्टरतावाद-दहशतवाद हा जगासाठी गंभीर धोका आहे. विचारधारा नवीन ओळखी आणि नवीन रूपे घेत राहतात पण त्यांचे हेतू बदलत नाहीत. ते मानवतेचे शत्रू आहेत. दहशतवादातून मुक्त होताना किंतु-परंतु असू शकत नाही,असेही ते म्हणाले.
भारत आणि अमेरिका दहशतवाद आणि कट्टरतावादाच्या विरोधात एकत्र आहेत. यावर कारवाई आवश्यक आहे. आपल्याला दहशत वाढवणाऱ्या शक्तींवर नियंत्रण ठेवावे लागेल. सीमेपलीकडील दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई करण्यावर आम्ही परस्पर सहमती दर्शवली आहे. तसेच इंडो-पॅसिफिक प्रदेश शांततापूर्ण आणि सुरक्षित असणे हे भारत आणि अमेरिकेचे सामायिक प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या शतकात भारताच्या स्वातंत्र्याने इतर देशांना स्वतंत्र होण्याची प्रेरणा दिली. जगाच्या लोकसंख्येच्या एक षष्ठांश भाग असलेला भारत या शतकात प्रगतीचा मापदंड तयार करेल, जो जगाला प्रेरणा देईल. सर्वांचा आधार, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न हीच आमची विचारसरणी आहे.
पीएम मोदी म्हणाले, भारत-अमेरिकेची परिस्थिती आणि इतिहास वेगळा आहे, पण आमची विचारसरणी आणि दृष्टी एकच आहे. यामुळे आम्ही एकजूट आहोत. आमची एकमेकांसोबतची भागीदारी नावीन्य आणते. विज्ञानाच्या नवीन संधी खुल्या होतात, ज्याचा मानवतेला फायदा होईल. हे आमच्या भागीदारीचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.