काबुल : तालिबानने अफगाणिस्तानात स्वतःचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मुल्ला बरादर यांच्या नेतृत्वाखाली तालिबानचे नेतृत्व जवळपास 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानात पोहोचले आहे. या दरम्यान एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना तालिबानने आश्वासन दिले आहे की, नवीन सरकारच्या अंतर्गत कोणाचाही सूड घेतला जाणार नाही.
तालिबानच्या संस्थापकांपैकी एक मुल्ला खैरुल्ला खैरखवाह यांनी म्हटलं की, आम्ही अफगाणिस्तानमध्ये प्रत्येकासाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.
तालिबानचे आणखी एक प्रमुख नेते अब्दुल सलाम हनाफी यांनी सांगितले की, 'आम्ही अफगाणिस्तानच्या सर्व लोकांना आश्वासन दिले आहे की कोणालाही इजा होणार नाही, लोकांना सुरक्षा दिली जाईल आणि सर्व सुविधा दिल्या जातील.'
अब्दुल सलाम हनाफी म्हणाले की, 'आम्ही जगातील लोकांनाही सांगतो की प्रत्येकाचे नागरिक सुरक्षित राहतील, आमची जमीन कोणत्याही देशाविरोधात वापरली जाणार नाही. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाऊ.'
मुल्ला बरादर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 20 वर्षांनंतर तालिबानचे सर्वोच्च नेतृत्व कंधारमध्ये परतले आहे. 2001 मध्ये अमेरिकन आणि नाटो सैन्याने या तालिबान नेत्यांना अफगाणिस्तानातून हद्दपार केले. आता जवळपास 20 वर्षांनंतर तालिबान पुन्हा इथे पोहोचला आहे.
तालिबान ( Taliban )लवकरच त्यांच्या नवीन सरकारची चौकट तयार करेल. असे मानले जाते की मुल्ला बरादर आता काबूलमध्ये ( Kabul ) राहतील आणि येथून तालिबानचे नेतृत्व करतील. तालिबान लवकरच दोहामध्ये नवीन सरकार स्थापनेवर चर्चा करेल. तालिबानने आश्वासन दिले आहे की यावेळी समाजातील प्रत्येक घटकास आणि महिलांना ही सरकारमध्ये स्थान दिले जाईल.