मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मोसेवाला यांची सार्वजनिक ठिकाणी हत्या झाल्यानंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. रविवारी सिद्धू मोसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा हस्तक गोल्डी ब्रार याने स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर आता हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खरंतर, 2008 मध्ये सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती.
सलमानच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त
एका वृत्तानुसार, प्रसिद्ध गायक आणि रॅपर सिद्धू मोसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. सिद्धू मोसेवालाच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याने स्टार अभिनेता सलमानच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलली जात असल्याचं मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सलमान खानच्या खासगी सुरक्षा दलासह मुंबई पोलिसांचे सुमारे 6 कॉन्स्टेबल त्याच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात येणार आहेत. ज्या अंतर्गत सलमानच्या घराबाहेर पोलीस तैनात असतील. जेणेकरून राजस्थानची ही टोळी कोणताही अनुचित प्रकार घडवू शकणार नाही.
सलमान खानला का आली जिवे मारण्याच्या धमकी?
खरंतर लॉरेन्स बिश्नोईने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामागील कारण म्हणजे राजस्थानच्या बिष्णोई समाजात काळ्या हरणाला पवित्र प्राणी मानलं जातं.
याच कारणामुळे लॉरेन्स बिश्नोईने २००८ मध्ये कोर्टाबाहेर 'आम्ही जोधपूरमध्येच सलमान खानला मारणार' असं म्हटलं होतं. सध्या मी काही करणार नाही पण जेव्हा आपण सलमान खानला मारणार तेव्हा सर्वांना कळेल. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.