मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी मोठ्या कालांतराने बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. आदित्य चोप्रासोबत लग्न केल्यानंतर या दोघांच्या आयुष्यात आदिरा ही चिमुकली आली. त्यामुळे अनेक वर्ष हिंदी रूपेरी पडद्यापासून दूर गेलेली राणी मुखर्जी पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागम करत आहे.
राणी मुखर्जीचा 'हिचकी' हा चित्रपट 23 मार्च रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या राणी मुखर्जी बिझी आहे. या प्रमोशन अॅक्टिव्हिटीमध्ये तिने अनेक कलाकारांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या 'हिचकी' म्हणजेच अडचणींबाबत विचारणा केली आहे. सोबतच या हिचकीवर त्यांनी कशी मात केली याबाबतही विचारणा केली आहे.
राणी मुखर्जीने सलमान खानलादेखील त्याच्या आयुष्यातील 'हिचकी' अडचणीबाबत विचारणा केली होती. त्यावर सलमान खाननेही दिलखुलास उत्तर दिले.
सलमान खानने दिलेल्या माहितीनुसार, तो सुरूवातीच्या काळात काम मूळीच गांभिर्याने घेत नव्हता. हीच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी हिचकी होती. कालांतराने मी माझे काम अधिक गांभिर्याने घ्यायला लागलो. कामापेक्षा चांगले काहीही नाही हे मला कळून चुकले आहे असेही सलमान खान म्हणाला.
स्वतःच्या कामाची स्वतः प्रशंसा करा, त्याबद्दल समाधान आणि आभार व्यक्त करा असे सलमान खान म्हणाला आहे.
शाहरूख खानने आई वडिलांना गमावणं ही हिचकी असल्याचं म्हटलं आहे. तर कॅटरिनाने सुरूवातीला 'डान्स' , अजय देवगणला त्याचे लूक्स आणि त्यावर बॉलिवूडमध्ये असलेली त्याची प्रतिमा, अनिक कपूरला त्याची स्माईल, करण जोहरचा त्याचा आवाज हा 'हिचकी' वाटत होता.
'हिचकी' या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी नैना माथूर ही भूमिका साकारत आहे. ही मुलगी शिक्षिका असून तिला टॉरेट सिंड्रोमचा आजार असतो. या आजारात रुग्ण सामान्यपणे बोलताना अडखळतो.
स्पष्ट बोलता न येणं या आव्हानावर नैना माथूर कशी मात करते, शिक्षिका होण्याचं तिचं स्वप्न कसं पूर्ण करते हा तिचा संघर्ष पाहणं उत्सुकतेचं आहे.