मुंबई : गानसरस्वती अशी ओळख असणाऱ्या लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रविवारी सकाळी त्यांच्या निधनाती बातमी समोर आली आणि साऱ्या देशाच्या डोळ्यांतून आसवं घरंगळली. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्तावर ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी शिक्कामोर्तब केलं. (Lata Mangeshkar)
रुग्णालयात जेव्हा दीदी गेल्याचं कळलं तेव्हा परिचारिकांपासून मदतनीसांपर्यंत सर्वजणांनाच हुंदका दाटला. 2019 पासून दीदी इथं श्वसनाच्या त्रासामुळं आल्या होत्या.
किंबहुना त्यांचं या रुग्णालयाशी असणारं नातं त्याही आधीपासूनचं. दीदीचे इथे काही व्यक्तींशी खास नात्यांचे बंध. त्यापैकीच एक नातं असं होतं, ज्याच्यापासून हे संपूर्ण जग अनभिज्ञ होतं.
हे नातं असं होतं जिथं दीदी मनमोकळेपणानं बोलत होत्या, जिथे अपेक्षांचं ओझं नव्हतं आणि ज्या नात्यावर कोणाच्याही नजरा नव्हत्या.
हे नातं होतं रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांची आठ वर्षांची मुलगी आणि लता दीदी यांच्यातलं.
2019 मध्येच समदानी पहिल्यांदा दीदींना भेटले. डॉक्टरांशी दीदींचं नातं इतकं घट्ट झालं, की कोविडमुळं त्यांची भेट घेणं अशक्य असल्यामुळं व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीची चौकशी होऊ लागली.
आरोग्याबाबत चर्चा झाल्यानंतर आयुष्य, कार्यक्रम, आठवणी अशा चौफेर गप्पा दीदी आणि डॉक्टरांमध्ये रंगत असत. यातच डॉक्टरांच्या मुलीचं आमि दीदींचं नातं आकारास आलं.
अनेकदा दीदी तिच्याशीच संवाद साधताना दिसत. त्यांना तिला भेटायचंही होतं. पण, कोरोना काळामुलं ते शक्य झालं नाही. दीदींच्या जाण्याचं समदानी यांच्या मुलीला कळताच त्या चिमुकलीलाही भावना दाटून आल्या.
यावेळीसुद्धा दीदींना बरं करुन आपण घरी पाठवू अशी डॉक्टरांना आशा होती. पण, वाढतं वय आणि खालावणारी प्रकृती ही आव्हानं अधिक गंभीर झाली आणि दीदींनी अखेरचा श्वास घेतला.
दीदी या रुग्णालयात आल्यावर कायम येथे काम करणाऱ्यांशी संवाद साधायच्या, गप्पा मारायच्या. अनेकदा त्यांच्याकडे असणाऱ्या पैंजणांबद्दल सांगायच्या.
दीदींची एक झलकही सर्वांना हवीहवीशी वाटाय़ची. कोविडमुळे जेव्हा संपर्क ठेवणं कठीण झालं तेव्हा वॉर्डच्या काचेतून त्यांना पाहूनच अनेकजणांना दिलासा मिळत होता.
दीदी या जगातून गेल्या असल्या तरीही त्यांच्या याच आठवणी चाहत्यांसाठी मोठा खजिना ठरत आहेत.