मुंबई : नाते उत्तम बॉण्डींगने अधिक मजबूत होते. यासाठी एकमेकांच्या सुख-दुखात तुम्हाला सहभागी व्हावे लागेल. प्रत्येक कामात पार्टनरला मदत करणे, जबाबदारी वाटून घेतल्याने नाते मजबूत होते. एकमेकांचे पैलू जाणून घेतल्याने नात्यात आनंद येतो. तर घरातील कामांना दुय्यम मानणाऱ्या पुरुषांनी एकदा तरी आपल्या बायकोला कामात मदत करुन पहा आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद न्याहाळा. तो गगनात मावेनासा झालेला दिसेल. तर घरातील कामात मदत केल्याने तुमच्या नात्याला हे फायदे होतील. पहा कोणते आहेत ते फायदे...
अनेक घरांमध्ये घरातील सर्वच कामे महिला करतात. तर घरातील कामे करणे कमीपणाचे समजले जाण्याची प्रवृत्ती आपल्या समाज्यात आहे. अशात त्यांचा पार्टनर घरातील कामात मदत करत असेल तर त्याला त्या कामाचे महत्त्व कळते. पार्टनरला समानतेची जाणीव होते आणि त्यातून नक्कीच आनंद प्राप्ती होते.
एकत्र काम केल्याने एकमेकांशी गप्पा मारण्याची संधी मिळते. एकमेकांसोबत वेळ घालवता येतो. घरातील कामे एकत्र मिळून केल्याने लवकर आवरतात आणि तुम्हाला मोकळा वेळही मिळतो. नाते मजबूत होते.
तुमची जबाबदारी कोणी वाटून घेतल्यास खूप छान वाटते. पुरुषांनी घरातील कामांची काही जबाबदारी उचल्यास महिला फार आनंदीत होतात. घरातील लहानसे काम केल्याने देखील महिलांना जबाबदारी हलकी झाल्यासारखी वाटते आणि काम करण्यासाठी त्या अधिक प्रेरीत होतात.
घरातील काम करताना महिलांना अनेकदा मी एकटेच सगळे करायचे का? हा प्रश्न पडतो. त्यामुळे एकटेपणा, चिडचिड, निराशा वाढते. अशा भावनांचे कालांतराने तणावात रुपांतर होते. परिणामी स्वभावात नको असलेला बदल होतो. मन, शरीर थकते. मनात विचारांचे काहुर माजते. पण मदतीचा हात पुढे करताच महिला स्वतःला अधिक मजबूत समजू लागतात. मानसिकता चांगली राहते.
घरातील कामात पार्टनरला मदत करताना खाण्या-पिण्याची आवड निवड समजते. काम करण्याचे स्वरुप लक्षात येते. नाते अधिक घट्ट होते आणि नव्याने उलघडते.
घरातील काम पुरुष करतात त्या कामापेक्षा कमी दर्जाचे असते, अशा मानसिकतेचा सामना पुरुषांना करावा लागतो. अशावेळी पुरुष जेव्हा घरातील कामात हातभार लावतात, तेव्हा घरातील कामांचे महत्त्वही अधोरेखित होते. त्याचबरोबर त्यांना महिला घेत असलेल्या मेहनतीचा अंदाज येतो आणि ते महिलांचे कौतुकही करतात.