मुंबई : जगातील सगळ्यात वजनदान मुलाचं वजन घटवण्यासाठी दिल्लीत एक यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. स्वतःच्या पायावर उभा राहू न शकणार्या मुलावर आता शस्त्रक्रियेच्या मदतीने वजन घटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
दिल्लीतील मिहीर जैन हा 14 वर्षीय मुलगा जगातील सगळ्यात लठ्ठ मुलगा आहे. दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये मिहीरवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सर्जन प्रदीप चौबे यांनी मिहीरवर शस्त्रक्रिया केली. एखाद्या लहान मुलामध्ये लठ्ठपणाची अशी पातळी पहिल्यांदाच पाहण्यात आली आहे.
वैद्यशास्त्रानुसार, सामान्य व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स 22.5 किलोग्राम प्रतिवर्ग मीटर इतका असणं अपेक्षित असतो. मात्र हा 32.5 च्या वर गेल्यास ती व्यक्ती लठ्ठ समजली जाते. जेव्हा बॉडी मास इंडेक्स 40-60 मध्ये जातो तेव्हा लठ्ठपणा हा आजार समजला जातो. मिहीरचा बॉडी मास इंडेक्स मात्र वयाच्या 14व्या वर्षी 92 होता.
2003 साली मिहीरचा जन्म झाला. तेव्हा त्याचे वजन 2.5 किलो होते. हळूहळू त्याचे वजन वाढायला लागले. मिहीर 5 वर्षांचा असताना त्याचे वजन 60-70 किलो होते. सुरूवातीला या समस्येकडे लक्ष देण्यात आले नाही. मात्र हळूहळू त्याला स्वतःच्या पायावर उभं राहणंदेखील अवघड झाले होते. दुसरी इयत्तेमध्ये असल्यापासून त्याचे शाळेत जाणं बंद झाले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मिहीर पास्ता आणि पिझ्झा खाण्याचा वेडा होता. हे दोन्ही पदार्थ केव्हाही आणि कितीही प्रमाणात खाण्याची त्याला सवय जडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्या खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचे पहिले आव्हान पार केले.
2010 साली जैन परिवाराने मिहीरला लठ्ठपणाशी सामना करण्यासाठी वैद्यकीय मदत घेण्याचे ठरवले. मिहीरची तपासणी झाल्यानंतर इतक्या कमी वयात वजन घटवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉ. चौबेंनी मिहीरचं वजन घटवण्यासाठी प्लॅन बनवला. त्यानुसार सुरूवातीला कमी कॅलरीचे जेवण (वीएलसीडी) देण्यात आले.
सामान्य जेवणामध्ये 2500 ते 3000 कॅलरीज असतात. वीएलसीडी जेवणामध्ये 800 कॅलरीज असतात. डाएटमध्ये करण्यात आलेल्या या बदलामुळे मिहीरचे महिन्याभरात सुमारे 10 किलो वजन कमी झाले. हे पाहून पुढील दोन महिने हाच डाएट प्लॅन ठेवण्यात आला. त्यामुळे केवळ आहारात बदल करून त्याचे वजन 196 पर्यंत आणण्यामध्ये डॉक्टरांना यश मिळाले. त्यानंतर मिहीरवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉक्टरांना मिहीरवर लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करताना मोठे आव्हान होते. त्याच्या शरीरात 12 इंच चरबी वाढलेली होती. पुढील तीन वर्षांमध्ये मिहीरचे वजन 100 किलो कमी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न आहेत. सध्या मिहीरचे वजन177 किलोपर्यंत कमी झाले आहे.