मुंबई : अनेकजण दिवसभर काम करून रात्रीच्या वेळेस घरी पोहचतात. अशावेळेस जेवणानंतर टीव्हीसमोर लोळतच झोपी जातात. बसून काम करण्याची जीवनशैली आणि धकाधकीचं जीवन यामधून अनेकांना व्यायाम करण्याचा वेळ मिळत नाही.
शरीराची हालचाल न झाल्याने त्यामधूनच अनेक रोग, आजार वाढतात. म्हणूनच वर्षानुवर्ष आपल्याकडे जेवणानंतर शतपावली घालण्याचा नियम सांगितला आहे. मग जेवणानंतर किमान १५-२० मिनिटं वेळ काढून चालण्याची सवय ठेवा.
जेवणानंतर लगेजच झोपणे हे आरोग्यासाठी त्रासदायक ठरते. रात्रीच्या जेवणानंतर किमान पंधरा मिनिटं चालल्यानंतर अन्नाचे पचन होण्यास मदत होते. पित्ताचा त्रास होत नाही.
आजकाल अनेकांना निद्रानाशाची समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी औषध गोळ्यांऐवजी काही योगासन आणि चालण्याची सवय फायदेशीर ठरते. यामुळे रात्रीची शांत झोप येण्यास मदत येते. चालल्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.
जेवणानंतर रात्रीच्या वेळेस १५ मिनिटं चालल्यास हा व्यायामाचा एक उत्तम भाग असू शकतो. यामुळे टाईप २ डाएबेटीस आटोक्यात राहतो. अचानक रक्तातील वाढणार्या साखरेचं प्रमाण आटोक्यात राहते.
चालणं हा एक उत्तम व्यायाम समजला जातो. जेवणानंतर चालल्यास तुमचे वजन आटोक्यात राहते. अनावश्यक कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे डाएटच्या सोबतीने किमान चालण्याचा व्यायाम केल्यास वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
शरीराचे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तुमचा मेटॅबॉलिझम रेट महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तो सुधारण्यासाठी डाएट जशी प्रमुख भूमिका पार पाडते तसेच तुमचा व्यायामदेखील गरजेचा असतो. शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी चालणं आवश्यक आहे.