दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत व्हायरसची लागण होणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढली आहे. अशातत खाजगी रुग्णालयाने केलेल्या अभ्यासात असं दिसून आलंय की, सध्याच्या लाटेत कोविडमुळे मृत्यू झालेल्यांपैकी 60 टक्के लोकांनी एकतर एकच डोस घेतला होता किंवा लसीकरण झालेलं नव्हते.
मॅक्स हेल्थकेअरच्या अभ्यासानुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बहुतेक व्यक्तींचं वय 70 पेक्षा जास्त होतं आणि त्यापैकी अनेकांना डायबेटीज, कॅन्सर, किडनी तसंच हृदयाशी संबंधित आजार होते.
रुग्णालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मॅक्स रुग्णालयांमध्ये आतापर्यंत सुमारे 82 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 60 टक्के व्यक्तींना एकंही डोस घेतला नव्हता किंवा लसीकरण झालं नव्हतं.
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या किंवा आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या मृत्यूच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केलीये.
कोरोनाच्या महामारीत तीन्ही लाटांमध्ये केलेला तुलनात्मक अभ्यास असं सांगतो की की, तिसऱ्या लाटेदरम्यान, केवळ 23.4 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती. तर दुसऱ्या लाटेत डेल्टा संसर्गामुळे 74 टक्के आणि पहिल्या लाटेत 63 टक्के ऑक्सिजनची गरज असल्याचं दिसून आलं.
रुग्णालयाच्या म्हणण्याप्रमाणे, गेल्या लाटेत 28,000 प्रकरणं नोंदवली गेली, तेव्हा रुग्णालयातील बेड रिकामी नव्हते. आयसीयू बेडचीही कमतरता होती. गेल्या आठवड्यात जेव्हा तिसऱ्या लाटेची सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली, तेव्हा रुग्णालयांमध्ये अशी कोणतीही कमतरता दिसून आली नाही.
अभ्यासात असंही म्हटलंय की, गेल्या 10 दिवसांपासून रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढलीये. परंतु ओमायक्रॉन व्हेरिएंट गेल्या स्ट्रेनपेक्षा खूपच सौम्य आहे. लसीकरणामुळे रूग्णालयात दाखल करण्याचा धोकाही कमी झाला आहे. तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून ते 20 जानेवारीपर्यंतचा डेटा या अभ्यासात समाविष्ट करण्यात आला.