नवी दिल्ली - अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीची पूर्वपरीक्षा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात होते. त्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे कल पाहता काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली असल्याचे स्पष्ट होते. मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये अनेक विकासकामे झाल्याचा दावा भाजपने केला असला, तरी मतदारांनी तो नाकारला आहे आणि काँग्रेसच भाजपला सक्षम पर्याय आहे, यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर या निकालांमुळे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही निवडणुकांत सातत्याने पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला आणि विशेषतः पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना नवे बळ मिळाले आहे. काँग्रेसच्या कार्यालयांबाहेर मंगळवारी सकाळपासूनच जल्लोषाचे वातावरण असल्याचे दिसते.
सर्वसाधारणपणे सत्ताधाऱ्यांना बदलायचे असेल, तर मतदार सक्षम पर्याय आहे का, याचा विचार करतो. जर सक्षम पर्याय दिसत नसेल, तर सत्ताधाऱ्यांना नाकारून पर्याय निवडला जातो. आज आलेल्या निकालांवरून काँग्रेस भाजपपुढे सक्षम पर्याय म्हणून उभा राहतोय, हे स्पष्ट झाले.
देशात मे २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांना महत्त्व आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजप सत्तेवर होता. राज्यातील शेतकऱ्यांचा सरकारवर रोष होता. याचे पडसाद निवडणुकीच्या निकालांवर पडल्याचे दिसते. अॅंटि इन्कम्बन्सीचाही परिणाम झाल्याचे दिसते.
राजस्थानमध्ये दर विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला हार पत्करावी लागते. यावेळी तेच घडले. वसुंधरा राजे यांच्या नेतृत्त्वावर राजस्थानमधील जनता नाराज होती. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलही अनेक आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे 'मोदी तुझसे बैर नहीं, वसुंधरा तेरी खैर नहीं' स्वरुपाच्या घोषणा निवडणुकीच्या प्रचारात देण्यात आल्या होत्या. असे असतानाही नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये विविध ठिकाणी प्रचारसभा घेऊन भाजपला यश मिळवून देण्याचे प्रयत्न केले. पण मतदारांनी भाजपऐवजी काँग्रेसवर विश्वास दाखवला.
छत्तीसगढमध्येही अॅंटि इन्कम्बन्सीचा मुद्दा प्रभावी ठरला आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या रमणसिंह यांच्या सरकारबद्दल मतदारांमध्ये नाराजी होती. ती मतदान यंत्रातून बाहेर पडली. लोकांनी त्यांना नाकारत काँग्रेसला जवळ केले. छत्तीसगढमधील नक्षलवादाचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यात रमणसिंह अपयशी ठरल्याची भावना लोकांमध्ये होती.
तेलंगणामध्ये काँग्रेस आणि तेलगू देसम पार्टीने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला सत्तेतून पायउतार करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळाले नाही. तेलंगणातील जवळपास २/३ मतदारांनी चंद्रशेखर राव यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. राव यांनी मुदतपूर्व विधानसभा बरखास्त करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला केंद्रीय स्तरावर काम करायचे आहे, त्यामुळेच आपण राज्यात लवकर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याचे चंद्रशेखर राव यांनी सांगितले होते. त्यांचा हा निर्णय योग्यच असल्याचे निवडणुकीच्या निकालांवरून दिसते.
निवडणूक झालेल्या अन्य राज्यात काँग्रेसला यश मिळाले असले, तरी मिझोराममध्ये काँग्रेस सत्तेतून पायउतार झाली आहे. मिझोराम नॅशनल फ्रंटला इथे सत्ता स्थापन करण्यासाठी मतदारांनी कौल दिला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता लोकसभा निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट दिसते आहे.
ताज्या अपडेटसाठी LIVE TV