Big Political Decision Before 31st January: बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी राज्याच्या राजकारणामध्ये पुढील आठवड्याभरामध्ये मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर लालू प्रसाद यादव त्यांच्या पुत्राला म्हणजेच तेजस्वी यादवला मुख्यमंत्री बनवण्यासाठी दबाव आणत असल्याचं मांझी यांचं म्हणणं आहे. याच कारणामुळे 31 जानेवारी आधी नीतीश कुमार महागटबंधनपासून वेगळे होतील. बिहारमध्ये बदलाचे वारं वाहत आहेत, असंही मांझी यांनी म्हटलं आहे.
नीतीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीबरोबर जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असं म्हटलं जातं. तुम्हाला हा दावा पटतो का? खरंच मागील काही दिवसांमध्ये भाजपाबरोबर जवळीक साधून लालू प्रसाद यादव यांच्यावर नीतीश कुमार यांनी दबाव निर्माण केला आहे का? असा प्रश्न मांझी यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मांझी यांनी, "लालू प्रसाद यादव यांचं एकच ध्येय आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवावं. मी त्यांच्याबरोबर जेवढं काम केलं आहे त्यावरुन मला असं वाटतं की नीतीश कुमार कोणत्याही परिस्थितीमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करणार नाही. दोघांचे मार्ग अगदी पूर्व-पश्चिम असे आहेत. अशा परिस्थितीमध्ये दोघांचं जुळून येणं अशक्य आहे. तिसरा पर्याय बिहारच्या राजकारणात पाहायला मिळू शकतो. तिसरा पर्याय हाच अशू शकतो की बिहारच्या हितामध्ये नीतीश कुमार एनडीएशी जवळीक करु शकतात," असं उत्तर दिलं.
भाजपाने जो मास्टर स्ट्रोक लावला आहे. भाजपा शक्यतो एकट्यानेच निवडणुकींना समोरे जाईल. नीतीश कुमार यांच्याबरोबर जाणं ते टाळतील, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं मांझी यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना, "हा राजकीय प्रश्न आहे. मी माझ्या अनुभवावरुन सांगतो की कोणत्याही परिस्थितीत नीतीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करु नये. यातच राज्याचं हित आहे. इतर काही पर्याय असेल तर तो नीतीश यांनी निवडला पाहिजे. त्यातच राज्याचं हित आहे. नाहीतर राज्याचं फार नुकसान होईल,"
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण व्यक्त केलेल्या शक्यतांपैकी 3 पैकी 2 गोष्टी घडल्या आहेत असं नमूद करतानाच पुढील गोष्ट महिना संपण्याच्या आत घडेल असं माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. "22 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान काही गोष्टी होतील हे मी बोललो होतो. एक अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले. दुसरी गोष्ट कर्पूरी ठाकुर यांना भारतरत्न मिळाला. तिसरी गोष्ट माझ्यामते तरी बिहारमध्ये परिवर्तनाचे वारे वाहताना दिसतील," असं मांझी म्हणाले.