नागपूर: नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) हे मुस्लिमविरोधी नाही. आपल्या सगळ्यांना या देशात सोबत राहायचे आहे. त्यामुळे CAA कायद्यामुळे मुस्लिम समाजाने घाबरून जाण्याचे कारण नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते रविवारी नागपूरच्या संविधान चौकात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, हिंदू शरणार्थी अनेक वर्षांपासून भारतामध्ये वाईट अवस्थेत राहत आहेत. त्यांनी हिंदू असणे हे पाप आहे का? केवळ पाकिस्तानमध्ये जन्माला आले म्हणून त्यांना अधिकार नाहीत का, असा सवाल यावेळी गडकरींनी उपस्थित केला.
देशाची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमधील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा महात्मा गांधीजी यांनी महत्त्वाचे विधान केले होते. पाकिस्तानमधील अल्पसंख्याकाना आधार लागेल तेव्हा भारताने त्यांना आसरा द्यावा, असे गांधीजींनी म्हटल्याची आठवण गडकरी यांनी करुन दिली.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी लिहलेल्या संविधानातही शरणार्थी किंवा निर्वासित (रेफ्युजी) ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन आणि पारशी लोक निर्वासित ठरतात. मात्र, काहीजणांकडून मुस्लिमधर्मीयांना आसरा का दिला नाही, असा सवाल विचारला जात आहे. परंतु, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे इस्लामी देश आहेत, ही बाब त्यांनी ध्यानात घ्यावी. त्यामुळे ते अल्पसंख्याक ठरत नाहीत. याठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत असला तरी त्यांना आसरा देण्यासाठी जगात अनेक इस्लामी देश असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
तसेच स्वधर्मीयांचा सन्मान हीच आमची संस्कृती आहे. मात्र, देशातील मुस्लिमांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. आमच्या गुरूंनी कधीच आम्हाला मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवले नाही. त्यामुळे आम्हाला देशातील मुस्लिमांना बाहेर काढायचे नाही, केवळ घुसखोरांना हाकलायचे आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे मुस्लिम समाजाने काँग्रेसारख्या डबघाईला आलेल्या पक्षांच्या गैरप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन गडकरी यांनी केले. काँग्रेसने व्होटबँकेच्या राजकारणासाठी परदेशी घुसखोरांसाठी रेड कार्पेट टाकले. तुम्ही भारतामध्ये या, संपत्ती खरेदी करा, देशासोबत ईमान बाळगा अथवा नको, मात्र आम्हाला मत द्या, याकडेच काँग्रेसने लक्ष दिले. या सर्व गोष्टी चुकीच्या असतील तर मग आम्ही ते सुधारतच आहोत ना, असे गडकरी यांनी सांगितले.