International Yoga Day का साजरा करायचा? इतिहास, महत्त्व आणि यंदाच्या थीमबद्दल जाणून घ्या

 Yoga Day 2023: योग ही सर्वांच्या सर्वांगीण कल्याणासाठी भारतात विकसित केलेली शारीरिक व्यायामाची प्राचीन प्रथा आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 20, 2023, 09:10 PM IST
International Yoga Day का साजरा करायचा? इतिहास, महत्त्व आणि यंदाच्या थीमबद्दल जाणून घ्या title=

International Yoga Day 2023: योग ही सर्वांच्या सर्वांगीण कल्याणासाठी भारतात विकसित केलेली शारीरिक व्यायामाची प्राचीन प्रथा आहे. योगासनांमध्ये 'आसन' नावाचा शारीरिक व्यायाम, श्वासोच्छवासाचे तंत्र आणि ध्यान यांचा समावेश होतो. योग मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील समतोल राखतो. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधीपासून साजरा करण्यात येतोय? योग दिन 2023 ची थीम, महत्त्व याबद्दल जाणून घेऊया. 

इतिहास

27 सप्टेंबर 2014 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना आंतरराष्ट्रीय योग दिवसाची स्थापना करण्याची सूचना केली. त्यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन करण्याचा प्रस्ताव ठेवला. ठरावाला UN सदस्य देशांकडून  पाठिंबा मिळाला. यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी ठराव मंजूर करण्यात आला. सर्वांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे सर्वांगीण फायदे मान्य केले आणि संतुलित जीवनशैली जगण्यासाठी त्याचे महत्त्व पटवून दिले.

पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा करण्यात आला?

21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नवी दिल्ली येथे प्राथमिक कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील मान्यवरांसह लाखो नागरिकांनी सार्वजनिकरित्या योगासने केली. 

योगा दिवसाचे जागतिक महत्त्व सांगून भारताच्या आणि जगभरातील विविध भागात अशाच प्रकारचे उत्सव आयोजित करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व

आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगा सरावाच्या असंख्य फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि जगभरातील लोकांना निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो. यासोबतच शारीरिक आणि मानसिक निरोगीपणाचे महत्त्व आणि ते संतुलन साधण्यासाठी योगाची भूमिका अधोरेखित होते.

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 ची थीम

दरवर्षी, योगाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी एक वेगळी थीम निवडली जाते. या दिवशी व्यक्ती, समुदाय आणि संस्थांमध्ये कार्यशाळा, परिसंवाद, प्रदर्शन आणि सार्वजनिक प्रात्यक्षिके केली जातात. 

आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 ची थीम 'वसुधैव कुटुंबकमसाठी योग' अशी आहे. या वर्षी 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून भारतात आणि परदेशातही भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

21 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात समारंभाचे नेतृत्व करतील. त्याचवेळी केंद्रीय मंत्री, दिल्ली आणि भारतातील इतर अनेक शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.