Chandrayaan 3 Update : काही महिन्यांपूर्वीच इस्रोनं अतिशय महत्त्वाकांक्षी अशी चांद्रयान मोहिम हाती घेत ती यशस्वी करून दाखवली. जागतिक स्तरावर अंतराळ क्षेत्रामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करण्याची किमया करणारा भारत हा पहिलाच देश ठरला होता. अशा या मोहिमेत चंद्रावरील एक दिवस (पृथ्वीवरी 14 दिवस) रोवर आणि लँडरनं वेगळ्याच दृष्टीकोनातून चंद्र जगाला दाखवला आणि ही मोहीम अखेरच्या टप्प्यात आली. याच मोहिमेसाठी लँडर आणि रोवरला चंद्रापर्यंत नेणारं प्रोपल्शन मॉड्युल पृथ्वीवर नुकतंच परतत असल्याचं इस्रोनं जाहीर केलं.
इस्रोनं एका अनोख्या प्रयोगाच्या माध्यमातून हे पोपल्शन मॉड्युल परतण्यास काही क्षण उरल्याचं सांगत आता त्यामधून बचत झालेल्या इंधनाचा वापर दुसऱ्या मोहिमेसाठी करणार असल्याचंही स्पष्ट केलं. चांद्रयान - 3 चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परतलं. आता या मॉड्यूलचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. पृथ्वीची परिक्रमा करतच हे मॉड्यूल पृथ्वीवर परतणार आहे.
देशातील अंतराळ संशोधन संस्थेची ही उल्लेखनीय कामगिरी पाहून पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली. ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एक मैलाचा दगड गाठणाऱ्या इस्रोचं अभिनंदन केलं.
Congratulations @isro. Another technology milestone achieved in our future space endeavours including our goal to send an Indian to Moon by 2040. https://t.co/emUnLsg2EA
— Narendra Modi (@narendramodi) December 6, 2023
इस्रोचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केलीय. 'या ध्येयांमध्ये 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीराला पाठवण्याचं आपलं ध्येयदेखील समाविष्ट आहे', असं मोदींनी म्हटलं. त्यामुळं पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनंतर आतापासून अनेकांचं लक्ष या अंतराळवारीकडे लागून राहिलं आहे.
इस्रोच्या माहितीनुसार प्रोपल्शन मॉड्यूल मॉड्यूलला चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीवर परत आणण्याचा फायदा भविष्यातील मोहितीमांना होणार आहे. चांद्रयान 3 चं प्रोपल्शन मॉड्यूल 17 ऑगस्ट 2023 ला विक्रम लँडरपासून वेगळं झालं होतं. त्या क्षणापासून ते चंद्राभोवतीच परिक्रमण करताना दिसलं. दरम्यान आधी प्रोपल्शनचं आयुष्या 3 ते 6 महिने असेल असं सांगण्यात आलं होतं. पण, हे मॉड्यूल पुढील कैक वर्षे कार्यरत राहील असा दावा करत इस्रोनं त्यामध्ये बचत झालेल्या इंधनाचा आधार जोडला.