देशात कोरोनाबाधितांची संख्या १८ हजारांवर; गेल्या २४ तासांत १३३६ नवे कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासांत 705 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. 

Updated: Apr 21, 2020, 05:46 PM IST
देशात कोरोनाबाधितांची संख्या १८ हजारांवर; गेल्या २४ तासांत १३३६ नवे कोरोना रुग्ण title=
फोटो सौजन्य : ANI

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या 18 हजारांवर गेली आहे. आतापर्यंत देशात 18 हजार 601 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 1336 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. 

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. गेल्या 24 तासांत 705 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. एका दिवसांत इतके रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून आतापर्यंतचा हा आकडाही सर्वांत जास्त आहे. आतापर्यंत देशात एकूण 3252 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी याबाबत दिली.

अग्रवाल यांनी, देशात 14759 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं सांगितलं. देशातील 61 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही. राजस्थानमधील प्रतापगढमध्ये गेल्या 28 दिवसांपासून कोणीही नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नसल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं. 

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रुग्णालयांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. कोरोना युद्धांसाठी मास्टर डेटाबेस बनवण्यात आला आहे. कोरोनासंबंधी माहितीसाठी दोन वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत. कोरोनासंबंधी रुग्णालयांची संपूर्ण माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 15 हजार आयुष प्रोफेशन 15 राज्यांत पाठवण्यात आले आहे.

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात कोरोना हॉटस्पॉट नाहीत तेथे शेतीसंबंधी कामांना परवानगी देण्यात आली आहे. विट भट्ट्यांमध्ये काम सुरु करण्यात आलं आहे. कृषि आणि मनरेगा उपक्रमातून लॉकडाऊनमुळे हाताला काम नसलेल्या मजूरांना काम देण्यात येणार आहे.