Indian Railway : देशभरातून करोडो लोकं रेल्वेचा वापर प्रवासासाठी करतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच वेगवेगळ्या योजना आणि सेवा लोकांना पुरवत असते. रेल्वे लोकांना त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम उत्तम करते आणि यासाठी कितीतरी हात मेहनत घेत असतात. पण या रेल्वेचे काही नियम आहेत आणि त्या नियमांचे उल्लंघन केल्यास काही दंड देखील आकारले जातात. सगळ्यात मोठा नियम, कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करताना प्रवाशांकडे रेल्वे तिकीट असणं गरजेचं आहे. जर त्यांच्याकडे रेल्वे तिकीट नसेल तर टीटीई हा कोणत्याही स्टेशनला त्यांना उतरवू शकतो व त्यांच्याकडून दंड घेऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का? हा नियम महिलांना लागू होत नाही.. चला तर मग जाणून घेऊया विना तिकीट प्रवास करणाऱ्या महिलांना हा नियम का लागू होत नाही.
नियम काय आहे?
भारतीय रेल्वेनुसार जर कोणी महिला विनातिकीट एकट्याने प्रवास करत असेल तर तिला टीटीई कोणत्याही स्टेशनला उतरवू शकत नाही. या परिस्थितीत ती महिला दंड भरून पुढचा प्रवास करू शकते. पण एखाद्या महिलेकडे प्रवास करताना काहीच पैसे नसल्यास अशावेळी देखील टीटीई तिला ट्रेन मधून बाहेर काढू शकत नाही किंवा कोणत्याही स्टेशनला उतरवू शकत नाही. कारण अशा वेळेस टीटीई त्या महिलेचा सुरक्षिततेला प्राधान्य देत असतो. 1989 मध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा नियम लागू करण्यात आला होता.
महिलांजवळ तिकीट नसल्यास व पैसे नसल्यास काय करतात?
रेल्वेच्या एका टीटीईने याविषयी सांगितले की, ज्यावेळेस आमच्याकडे अशा प्रकारचे प्रकरण येतं अशावेळी आम्ही कंट्रोल रूमला याविषयीची माहिती देतो व ती महिला कोणत्या अवस्थेत आहे याचे निरीक्षण करतो. जर काही गडबड वाटल्यास याविषयीची माहिती आम्ही जीआरपीला देखील दिली जाते. मग यानंतर जीआरपी महिला कॉन्स्टेबलला हे प्रकरण कळवतो आणि याविषयीची चौकशी सुरू होते.
अनेकदा असं होतं की, स्लीपर क्लासचं महिला तिकीट घेतात व एसी क्लास मधून प्रवास करतात अशा वेळेसही टीटीई त्यांना स्लीपर क्लासमध्ये जाण्यासाठी सांगतो पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी केली जात नाही. इतकंच नव्हे तर, ज्या महिलांचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये असतं त्यांच्याकडे कन्फर्म तिकीट नसते आणि तरी त्या रेल्वे प्रवास करत असतात अशा वेळेस ही त्या एकट्या महिलेला ट्रेनमधून टीटीई उतरवू शकत नाही.