नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या ७, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांनी देशातील कोविड-१९ स्थिती आणि यापुढे करायच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.
केंद्र सरकार लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. २५ मार्चला लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरु झाला होता. त्यानंतर आणखी तीन टप्पे वाढवण्यात आले. लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असून त्यानंतर पाचवा टप्पा जाहीर करून लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. या चर्चेमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर देशात कोविड रुग्ण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेप्रमाणे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमातून देशाला संदेश देतात. या रविवारी मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे.
देशात कोविडचं संकट वाढतच असून देशभरात कोविड रुग्णांची संख्या १ लाख ६५ हजारावर पोहचली आहे. तर गुरुवारपासून शुक्रवारपर्यंत एका दिवसात ७ हजार ४६६ रुग्ण वाढले होते तर तब्बल १७५ जणांचा मृत्यू झाला होता. एका दिवसातील ही आजवरची सर्वात मोठी वाढ होती. देशभरात मृतांचा आकडा ४७०६ इतका झाला आहे.
कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या जगभरातल्या देशांत भारताचा नववा क्रमांक आहे. पण भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४२.८८ टक्के इतके आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.