'त्याने आपल्या पत्नीकडे एकटक का पाहू नये?', ज्वाला गुट्टा L&T च्या अध्यक्षांवर संतापली, 'तुमचं मानसिक आरोग्य...'

Jwala Gutta on SN Subrahmanyan: भारतीय बँडमिंटन स्टार ज्वाला गुट्टाने (Jwala Gutta) 'लार्सन अँड टुब्रो' म्हणजेच 'एल अँण्ड टी'चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन (SN Subrahmanyan) यांना खडेबोल सुनावले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jan 10, 2025, 07:28 PM IST
'त्याने आपल्या पत्नीकडे एकटक का पाहू नये?', ज्वाला गुट्टा L&T च्या अध्यक्षांवर संतापली, 'तुमचं मानसिक आरोग्य...' title=

Jwala Gutta on SN Subrahmanyan: बांधकाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या 'लार्सन अँड टुब्रो' म्हणजेच 'एल अँण्ड टी'चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांनी केलेल्या एका विधानामुळे ऑफिस आणि खासगी आयुष्य यांचा समतोल राखण्याचा विषय चर्चेत आला आहे. इंफोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्याप्रमाणे त्यांनी एका व्यक्तीने आठवड्याला 90 तास काम केलं पाहिजे असं मत मांडलं आहे. नारायण मूर्ती यांनी देशाला चांगली जागा बनवायचं असेल तर आठवड्याला 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. एसएन सुब्रमण्यन यांच्या विधानामुळे सोशल मीडियावर वाद पेटला आहे. यावर अनकेजण आपलं मत व्यक्त करत असताना भारताची माजी बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टानेही खडेबोल सुनावले आहेत. 

एसएन सुब्रमण्यन नेमकं काय म्हणाले?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एसएन सुब्रमण्यन सांगत आहे ती, "मला वाईट वाटतं की मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकत नाही. जर मी तुम्हाला रविवारीही काम करायला लावलं तर मी अधिक आनंदी होईन, कारण मी रविवारी काम करतो." यावेळी त्यांनी कर्मचारी घरी घालवत असलेल्या वेळेवरी टिप्पणी केली. "तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? चला, ऑफिसला जा आणि कामाला लागा," असंही ते म्हणाले. 

ज्वाला गुट्टाचा संताप

ज्वाला गुट्टाने एक्सवर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. "सर्वात प्रथम म्हणजे, त्याने आपल्या पत्नीकडे एकटक का पाहू नये, आणि फक्त रविवारीच का?", अशी विचारणा तिने केली आहे. ज्वाला गुट्टाने अध्यक्षांच्या टिप्पणीला "महिलाद्वेषी" असं संबोधलं आणि परिस्थिती "निराशाजनक आणि भयावह" असल्याचं वर्णन केलं.

"मोठ्या संस्थांच्या सर्वोच्च पदांवर असलेले असे सुशिक्षित लोक मानसिक आरोग्य आणि मानसिक विश्रांती गांभीर्याने घेत नाहीत हे दुःखद आणि कधीकधी अविश्वसनीय आहे... आणि अशी महिलाविरोधी विधाने करत आहेत आणि स्वतःला इतक्या उघडपणे उघड करत आहेत!! हे निराशाजनक आणि भयानक आहे," असं ती पुढे म्हणाली.

एल अँण्ड टीकडून स्पष्टीकरण

अध्यक्षांच्या या वक्तव्यावर अनेक सेलिब्रिटींसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीका झाल्यानंतर 'एल अँड टी'नेही एक निवेदन जारी केलं आहे. "आम्हाला वाटते की हे भारताचे दशक आहे, जो प्रगतीला चालना देण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या आपल्या सामायिक दृष्टिकोनाला साकार करण्यासाठी सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांची मागणी करणारा काळ आहे. अध्यक्षांचे वक्तव्य या मोठ्या महत्त्वाकांक्षेचे प्रतिबिंब आहे, असा भर देत की असाधारण निकालांसाठी असाधारण प्रयत्न आवश्यक आहेत," असे निवेदनात म्हटले आहे.