तिरुवनंतपुरम: मुसळधार पावसामुळे सध्या केरळमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये पूर आणि दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की, इडुक्की या धरणाचे दरवाजे २६ वर्षांनी उघडावे लागले आहेत. सध्या या धरणाच्या चार दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे पेरियार नदीच्या पाण्याची पातळी एक ते दीड मीटरने वाढली आहे.
केरळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इडुक्की धरणातील जलसाठ्याने १६८.२० मीटर इतकी पातळी गाठल्याने धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चोरनीकरा आणि कोंबांद या गावांमध्ये मदत शिबीरे उघडण्यात आली आहेत. पावसामुळे शहरांतील जीवनही विस्कळीत झाले आहे. सुदैवाने कोची विमातळावर अजूनपर्यंत आपातकालीन परिस्थिती घोषित करण्यात आलेली नाही.