मुंबई : Modi Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) आज सायंकाळी सहा वाजता होणार आहे. सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारमधील मंत्रिमंडळातील हा पहिलाच फेरबदल आणि विस्तार होत आहे. (Cabinet First Expansion) कोरोना प्रोटोकॉल डोळ्यासमोर ठेवून नव्या मंत्र्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या अशोक हॉलमध्ये होणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता मंत्र्यांसमवेत बैठक घेतील, ज्यात नवीन मंत्र्यांची नावे आणि त्यांचे विभाग निश्चित केले जाऊ शकतात. दरम्यान, महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, हिना गावित आणि भागवत कराड यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीनंतर मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी मंत्रिमंडळाचा हा पहिलाच विस्तार असून राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न यातून केला जात असल्याचं चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात राज्य आणि जात आधारित कोट्याचीही काळजी घेण्यात आली आहे. नवीन मंत्रिमंडळात सर्वाधिक प्रतिनिधित्व अन्य मागासवर्गीय वर्गाला (ओबीसी) असेल आणि नवीन मंत्रिमंडळात 25 पेक्षा जास्त ओबीसी मंत्री असतील. याशिवाय एससी आणि एसटी कोट्यातील 10-10 मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात येईल.
दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळात देशातील सर्वात तरुण मंत्रिमंडळात सहभागी करुन देण्यावर भर असणार आहे. कारण विस्तारात, तरुणांना अधिक प्राधान्य दिले गेले आहे. ज्यांचे सरासरी वय खूपच कमी आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळात सुशिक्षित लोकांचा समावेश केला जाईल आणि अधिकाधिक महिला सदस्यांचा सहभागही निश्चित मानला जात आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे जे नेते राज्यांमध्ये मंत्री आणि मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल. जेणेकरुन त्यांच्या अनुभवाचा लाभ घेता येईल. राज्यांच्या अनुभवाचा उपयोग केंद्र सरकारचे कामकाज सुलभ करण्यासाठी होईल.
ज्योतिरादित्य सिंधिया आणि सर्वानंद सोनोवाल यांची नावे आहेत ज्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकेल. अशा मंत्र्यांमध्ये सर्वोच्च स्थान आहे. याशिवाय जेडीयू नेते सुशील मोदी, बिहारचे उपमुख्यमंत्री राहिलेले, एलजेपी कोट्यातून पशुपती पारस, जेडीयूमधून आरसीपी सिंह किंवा ललन सिंह, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल, रिटा बहुगुणा जोशी, अजय भट्ट, महाराष्ट्रातील नारायण राणे, हिना गावित, यूपीमधील वरुण गांधी आदी नेत्यांची नावे नव्याने मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ शकतात.
याशिवाय कर्नाटकमधील प्रताप सिम्हा, हरियाणामधील बिजेंद्र सिंह, परवेश वर्मा, जफर इस्लाम, ओडिशा येथील अश्विनी वैष्णव यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण 52 मंत्री असून नियमांनुसार जास्तीत जास्त मंत्री 81 असू शकतात.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांना मंत्री बनविण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर नेत्यांना दिल्ली येथे बोलविण्यात आले होते. तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या अटकळांना मंगळवारी अधिक वेग आला आहे.