नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने आपली एक महत्वपूर्ण सेवा बंद केलीये. त्यामुळे याचा सरळ प्रभाव रेल्वे प्रवाशांवर पडणार आहे. नव्या नियमानुसार रेल्वेने आय तिकीट(i ticket) ची विक्री बंद केली आहे. रेल्वेच्या या सुविधेनुसार प्रवासी पेपर तिकीट ऑनलाईन घेऊ शकत होते.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, IRCTC ने आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून i-Ticket बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम १ मार्चपासून लागू होणार आहे.
ही सुविधा IRCTC ने २००२ मध्ये सुरू केली होती. या अंतर्गत IRCTC च्या वेबसाईटवरून तिकीट काऊंटरप्रमाणे पेपर तिकीट जनरेट केलं जाऊ शकत होतं. तिकीटचं बुकिंग केल्यानंतर रेल्वे प्रवाशांकडून देण्यात आलेल्या पत्त्यावर हे तिकीट डिलिव्हर केलं जायचं. यासाठी रेल्वेकडून स्लीपर/सेकंड क्लाससाठी ८० रूपये आणि एसी तिकीटासाठी १२० रूपये शुल्क आकारलं जायचं.
रेल्वे अधिका-याने सांगितलं की, आय तिकीट सुविधा ही त्या ग्राहकांसाठी सुरू केली होती जे ई-तिकीटाचं प्रिंट आऊट घेऊ शकत नव्हते. हे खासकरून ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी होतं. कागदाचा वापर कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.