मुंबई : श्रीकांत बोल्ला हे आज एक मोठे नाव बनले आहे. ज्यांना वाटते की, शारीरिक अक्षमता एखाद्या व्यक्तीच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते, त्यांच्यासाठी श्रीकांत बोला हे एक आदर्श उदाहरण आहे. श्रीकांत अंध असूनही आज छोटामोठा नव्हे तर कोट्यवधींचा मालक झाला आहे. एवढेच नाही तर २०२१ मध्ये फोर्ब्सच्या ३० अंडर ३० च्या यादीतही त्याला स्थान देण्यात आले आहे. श्रीकांतने हे खरं करुन दाखवलं आहे की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचं यश गाठायला मदत करु शकतो.
श्रीकांत बोला याचा जन्म 7 जुलै 1992 रोजी झाला. आंध्र प्रदेशातील सीतारामपुरम येथील मछलीपट्टणम येथे जन्मलेला श्रीकांत आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अंध होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला गरिबीचा सामना करावा लागला होता.
त्याच्या कुटुंबाचे उत्पन्न त्यावेळी महिन्याला सुमारे 1600 रुपये होते आणि अशा परिस्थितीत श्रीकांत नेत्रहीन असल्याने त्याच्याकडून कुटुंबाला सांभाळण्याची फारशी अपेक्षा नव्हती. त्याच्या या गोष्टीचा कुटुंबीयांना दु:ख तर होतंच, पण त्याच्यासोबतच आजूबाजूचे लोक आणि नातेवाईकही त्याचे अंधत्व स्वीकारण्यास असमर्थ होते. उलट सर्वांनी मिळून श्रीकांतच्या कुटुंबियांना त्याला मारण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यांनी श्रीकांतच्या कुटूंबियांना सांगितले की, हे मूल आंधळेच राहिले, तर मोठे होऊनही त्याचा कुटुंबाला काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा त्याला मारलेलंच बरं.
पण त्याचे आई-वडील यासाठी सहमत नव्हते कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाला वाचवायचे होते. त्यामुळेच त्यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि ठरवले की कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या मुलाला सांभाळून त्याचे संगोपन करायचे. श्रीकांतच्या आई-वडिलांनी त्याला सामान्य मुलाप्रमाणे वाढवले आणि शिकवले.
श्रीकांतच्या पालकांनी कोणत्याही परिस्थितीत त्याची साथ सोडली नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनीही श्रीकांतला गावातीलच शाळेत प्रवेश मिळवून दिला. पण श्रीकांतकडून कोणालाच फारशी आशा नव्हती. कारण अंध मूल कसे अभ्यास करेल किंवा त्याची प्रगती कशी होईल असे लोकांना वाटत होते.
त्यामुळे शाळेतही श्रीकांतला चांगली वागणूक दिली गेली नाही आणि त्याला वर्गात सगळ्यांच्या मागे शेवटच्या बाकावर बसवण्यात आलं. मात्र एवढे होऊनही श्रीकांतने कोणाचेही ऐकले नाही आणि न डगमगता अभ्यास सुरू ठेवला. वर्गातली मुलंही त्याची चेष्टा करायची पण त्याने त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्या मेहनतीचे फळ म्हणजे तो दरवर्षी वर्गात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो 90 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण झाला.
तो 10वी उत्तीर्ण झाला खरा, पण त्याला पुढे विज्ञानाचा अभ्यास करायचा होता. परंतु दृष्टिहीन मुलांसाठी विज्ञानासारखा विषय नाही, असा शाळेचा समज होता आणि हा नियम आहे. पण श्रीकांतने या नियमांविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले आणि शाळेविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शाळेविरुद्धचा हा लढा तब्बल ६ महिने चालला आणि अखेर त्याला शाळेतून विज्ञान शिकण्याची परवानगी मिळालीच.
शाळेत परवानगी देण्याबरोबरच श्रीकांतला स्वत:च्या जबाबदारीवर अभ्यास करावा लागेल, अशी अटही त्यांनी घातली आणि कोणत्याही प्रयोगादरम्यान श्रीकांतसोबत काही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी श्रीकांतचीच असेल. त्यानंतर त्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि दोन वर्षातच त्याने आपली कामगिरी इतकी चांगली केली की, त्याला 12वीत 98 टक्के गुण मिळाले आणि त्याला विज्ञानात प्रवेश न देणे ही शाळेची चूक असल्याचे त्याने सिद्ध केले.
12वीत चांगल्या कामगिरीसाठी त्याला अमेरिकेतील MIT म्हणजेच मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकण्याची संधीही देण्यात आली, जी त्याच्यासाठी मोठ्या यशापेक्षा कमी नव्हती. एमआयटीमध्ये प्रवेश मिळवणारा तो पहिला अंध विद्यार्थी ठरला आहे. येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू लागल्या. पण श्रीकांतने अमेरिकेत काम करण्यासाठी नकार दिला. कारण त्याला आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करायचे होते.
त्याला देशातील गरीब आणि दुर्बल लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं आणि याच कारणासाठी तो आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या मायदेशी परतला आणि आपल्या कामात गुंतला. इथूनच श्रीकांतच्या कार्याचा प्रवास सुरू झाला.
2012 मध्ये, देशातच श्रीकांत बोलाने बोलंट इंडस्ट्रीज नावाची ग्राहक खाद्य पॅकेजिंग कंपनी तयार केली. येथे पाने आणि कागदापासून पर्यावरणपूरक म्हजेच इको-फ्रेंडली पॅकेजिंग सुरू केले जाते. एकाच ठिकाणाहून सुरू झालेल्या या कंपनीचे आज ७ युनिट्स बनले आहेत. 2012 पासून कंपनी मासिक 20% दराने वाढत आहे. कंपनीची उलाढाल देखील वार्षिक 200 कोटींवर पोहोचली आहे. आणि त्याचे मूल्य देखील अंदाजे 400 कोटींहून अधिक आहे.
श्रीकांतच्या कंपनीने एवढी प्रगती केली आहे की 2021 मध्येच, फोर्ब्स (srikanth bolla in forbes 30 under 30 asia) ने श्रीकांतला 30 अंडर 30 एशिया यादीत स्थान दिले आहे. हे स्थान देशातील अशा व्यावसायिकांना दिले जाते ज्यांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे आणि ते आपल्या क्षेत्रात चांगले काम करत आहेत.
मात्र, श्रीकांतच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्याला त्याच्या व्यवसायासाठी कुठूनही निधी मिळत नव्हता. त्यानंतर त्याला भारतातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांनी मदत केली आणि श्रीकांतच्या कंपनीत 1.3 दशलक्ष गुंतवणूक केली. त्यानंतर श्रीकांतचा व्यवसायही वाढू लागला. दुसरीकडे, टाटा यांच्यासह सतीश रेड्डी, एसपी रेड्डी, श्रीनी राजू, चलमला सेट्टी, रवी मंथ यांनीही श्रीकांतच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे.
आज श्रीकांतच्या कंपनीत 1500 हून अधिक लोक काम करत आहेत. यात विशेष म्हणजे येथे काम करणारे बहुतांश कर्मचारी दिव्यांग आहेत. ही कंपनी श्रीकांतने 8 जणांसह सुरू केली होती. ज्यामध्ये त्याच्या आजूबाजूच्या काही बेरोजगार आणि अंध लोकांनाच काम देण्यात आले. पुढे काम वाढल्याने इतर लोकांनाही रोजगार दिला गेला. त्याच्या सर्ज इम्पॅक्ट फाऊंडेशनला विश्वास आहे की 2030 पर्यंत भारताला शिक्षणात पुढे नेण्यासोबतच देशातील बेरोजगारीही कमी होईल.
श्रीकांत बोला याला त्याच्या यशाबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामध्ये प्रतिष्ठित युवा सेवा पुरस्कार, तेलुगु फाइन आर्ट्स सोसायटीचा युवा उत्कृष्टता पुरस्कार, उद्योजक पुरस्कार 2015, बिझनेस लाइन यंग चेंज मेकर पुरस्कार 2018, इत्यादी देखील देण्यात आले आहेत. याशिवाय श्रीकांत भारताच्या अंध क्रिकेट संघातही खेळला आहे.