Video: बहिणीच्या लग्नात नाचताना 23 वर्षीय तरुणी स्टेजवर कोसळली; थेट तोंडावर आपटल्यानंतर सोडला प्राण

VIDEO 23 Year Old Dies On Stage: आपल्या बहिणीच्या लग्नानिमित्त आयोजित संगीत कार्यक्रमात स्टेजवर नाचत असताना अचानक ही तरुणी तोंडावर पडली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 10, 2025, 10:08 AM IST
Video: बहिणीच्या लग्नात नाचताना 23 वर्षीय तरुणी स्टेजवर कोसळली; थेट तोंडावर आपटल्यानंतर सोडला प्राण title=
अचानक नाचता नाचता ती पडली

VIDEO 23 Year Old Dies On Stage: मध्य प्रदेशमधील विदिशा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका लग्न सोहळ्यादरम्यान आयोजित संगीताच्या कार्यक्रमात स्टेजवर नाचत असलेल्या 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही तरुणी मंचावर नाचत असताना अचानक एखादी गोळी लागल्याप्रमाणे जागेवर पडली आणि तिचा मृत्यू झाला. रविवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

कोण आहे ही तरुणी? कधी घडला हा प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या तरुणीचं नाव परिणिता असं आहे. ही इंदूरची रहिवाशी असून ती तिच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी विदिशाला गेली होती. या कार्यक्रमात नाचतानाच तिचा मृत्यू झाला. हा सारा प्रकार शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे. महिलांच्या संगीताचा हा कार्यक्रम रात्री 9 वाजता सुरु झाला होता. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर तासाभरात हा प्रकार घडला. व्हिडीओमध्ये गाणं सुरु झाल्यानंतर अगदी उत्साहामध्ये परिणिता डान्स करताना दिसत आहे. वेगवेगळी गाणी एकत्र करुन तयार केलेल्या ट्रॅकवर नाचत होती. एकटीच मंचावर नाचणारी परिणिता अचानक स्टेजवर कोसळली. बरं ती अशी वाईट पद्धतीने कोसळली की तिचा चेहराच आधी जमीनीवर आपटला. एखाद्या चित्रपट अथवा मालिकेमधील सीन वाटावा असा हा प्रकार होता.

डॉक्टरांनी स्टेजवर घेतली धाव

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही डॉक्टरांनी स्टेजवर धाव घेत परिणिताला वाचवण्याचा प्रयत्न केला. सीपीआर देऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तिने या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

कशामुळे घडला हा प्रकार?

परिणिताला नक्की झालं काय याची माहिती समोर आलेली नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, नाचताना परिणिताला हृदयविकाराचा झटका आला. 'शरारा शरारा' हे गाणं सुरु झाल्यानंतर परिणिता तोल जाऊन तोंडावर पडली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. अडीच मिनिटांच्या डान्स फरफॉर्मन्सदरम्यान परिणिताने प्राण सोडला. 

सर्व कार्यक्रम रद्द

परिणिताच्या मृत्यूनंतर रविवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. परिणिताचे बरेचसे नातेवाईक विदीशाचे असल्याने तिच्या मृतदेहावर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.