नागपूर : गोसीखुर्द सिंचन घोटाळ्यात एसीबीने दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. मोखाबर्डी उपसा सिंचन प्रकल्प कालव्याच्या निविदा प्रकरणी एसीबीने हे आरोपपत्र दाखल केले आहे.
यासंदर्भात एसीबीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या तत्कालीन ५ अधिकाऱ्यांसह दोन कंत्राटदार कंपन्याच्या ७ संचालक आणि अधिकाऱ्यांसह एकूण १२ जणांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल केले आहे. आर जे शाह अँड कंपनी व डी ठक्कर कंस्ट्रक्शन कंपनी या खाजगी कंपन्यांचा या आरोपपत्रात समावेश आहे.
नागपूरच्या विशेष एसीबी न्यायालयात ४ हजार ४५७ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी ३० एप्रिल २०१६ ला नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही कंपनींना मोखाबर्डी उपसा सिंचन प्रकल्पात कालव्याचे काम देताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे शासनाचे ५६ कोटी ५७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं आरोपपत्रात म्हटले आहे.