नंदूरबार : न्यायालयीन कोठडीत तुरुंगात असलेल्या आरोपीला चक्क सोलापूर पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्या जात असल्याचा भयावह प्रकार नंदूरबारमध्ये समोर आला आहे.
विष्णू दळवी असे या आरोपीचे नाव असून आदिवासी विकास विभागाच्या बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळ्यातील तो प्रमुख आरोपीपैकी एक आहे. सध्या न्यायालयाने सोलापूरमधील एका गुन्ह्यात त्याची न्यायालयीन कोठडीत सोलापूर तुरुंगात रवानगी केली आहे.
मात्र शिष्यवृत्ती घोटाक्यातील नंदूरबारमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात नंदुरबार न्यायालयात त्याला हजर करण्यासाठी सोलापूर पोलीस त्याला नंदूरबारमध्ये घेऊन आले होते. मात्र त्याला न्यायालयात हजर करण्याआधी पोलीस त्याला नंदुरबार शहरातील एका खासगी घरात घेऊन जाऊन तिथे त्याची बडदास्त ठेवली.
काही सामाजिक संघटनांना या बद्दलची माहिती मिळताच त्यांनी या घरात दाखल होताच हा आरोपी आणि पोलीस या एका खासगी घरात आराम आढळून आले. या घटनेमुळे पोलीस कशा पद्धतीने आरोपींची 'काळजी' करत आहेत. या बाबतची भयानक वास्तविकतासमोर आली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्या नंतर नंदूरबार पोलीस अधीक्षकांनी आपल्या अधिकाऱ्यांमार्फत घटनेची चौकशी करत तसा अहवाल तयार केलाय. सोलापूर पोलीस आयुक्ताना तो पाठवण्यात येणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.