मुंबई : हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर साऱ्या राज्यातून आणि सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली. जोवर या घटनेच्या चर्चा थांबत नाहीत, तोवर राज्यात पुन्हा एकदा अशाच प्रकारची धडकी भरणारी घटना घडली आहे. घरगुती वादातून २६ वर्षांच्या विवाहितेला जिवंत पेटवून दिल्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे.
हिंगोलीतील आडगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा जळीतकांडाचं सत्र सुरुच असल्याचं उघड झालं आहे. संगीता शंकर हनवते असं या महिलेचं नाव असून, ती सुमारे ७४ टक्के भाजली आहे. तिच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या वादांनंतर रागाच्या भरात पीडितेच्या पतीने तिच्यावर रॉकेल ओतून तिला जाळलं. आपला जीव वाचवण्यासाठी पीडितेने आरडाओरड केली असता परिसरातील काही ग्रामस्थांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. ज्यानंतर तिला रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. पण, सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
घरगुती वादातून झालेल्या या घटनेबद्दल हिंगोली ग्रामीण पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, हुंडाबंदी कायद्यान्वये 504, 506, भादंवी 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात गावण्याच्या भीतीने पीडितेचा पती शंकर हनवते आणि सासू कमलबाई रामजी हनवते सध्या फरार आहेत.