Barsu Refinery Protest : राजापूर (Rajapur), बारसू, सोलगाव परिसरात क्रूड ऑईल रिफायनींग करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलिअम उद्योग ही रिफायनरी प्रस्तावित आहे. या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी सोमवारपासून माती परीक्षण करण्याची सुरुवात झाली आहे. स्थानिक गावकऱ्यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. या प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरूच आहे. मात्र आता पोलीस यंत्रणा आक्रमक झाली आहे. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांचा विरोधात बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबत आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या आहेत.
रिफायनरी विरोधातील आंदोलन आता दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. सर्वेक्षणाच्या ठिकाणी विरोधकांनीसुद्धा भेट केल्याने हे आंदोलन तीव्र झालं आहे. सर्वेक्षण होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. शुक्रवारी सर्वेक्षणाच्या ठिकाणी आंदोलकांनी कूच केली होती. मात्र त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वेक्षण होऊ देणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. सर्वेक्षणाच्या ठिकाणी आंदोलक पोहोचताच सुरुवातीला पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर सुरु करत त्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या देखील नळकांड्या फोडल्या.
आंदोलकांकडून वणवा लावण्याचा प्रयत्न - उद्योगमंत्री उदय सामंत
अश्रुधाराचा वापर करण्यात आलेला नाही. आंदोलनकर्त्यांनी जो वणवा लावण्याचा प्रयत्न केला आहे तो विझवताना तो धूर येत आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. "हे स्थानिकांचे आंदोलन नाही. मला हात जोडून सर्वांना विनंती करायची आहे की तुमच्या मताच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांची डोकी भडकवू नका. माझी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे की आपण चर्चेसाठी तयार आहोत. प्रकल्पाला विरोध का आहे हे समजवून घेऊ. मातीचे परिक्षण झाले म्हणजे आज उद्या प्रकल्प येणार नाही. स्थानिकांचा विरोध कमी होत असताना काही लोकांनी पक्षीय राजकारणाला स्थानिकांचे रुप देऊन हे आंदोलन केले आहे, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले आहे.
आंदोलनस्थळी गेलेल्या विनायक राऊत यांना अटक
बारसूमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्पास स्थानिक आंदोलकांसह विरोधकांनीही विरोध केला आहे. बारसूमध्ये परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे बारसूमध्ये प्रकल्प झाल्यास भूमिपुत्रांचा नव्हे, तर परप्रातीयांचा फायदा होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात स्थानिकांसह मिळून मोर्चा काढण्यात आला आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. मात्र आंदोलनस्थळी पोहोचताच खासदार विनायक राऊत यांना राजापूर पोलिसांनी अटक केली आहे. खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख, सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके , तालुका प्रमुख कमलाकर कदम, विधानसभा क्षेत्र प्रमुख चांद्रप्रकाश नकाशे , उपशहर प्रमुख रामचंद्र सरवणकर, विद्याधर पेडणेकर यांना अटक करण्यात आली आहे.