विष्णू बुरगे / बीड : सरकारने टोलटोलवी बंद करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. नाही तर विषाची बाटली पाठवावी. बीडमधल्या नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्याचा अगतिक हंबरडा फोडला आहे. शेतकऱ्याची दिवाळी कडूच होणार अशी चिन्हं आहेत. मोठ्या लगबगीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी दहा हजारांच्या मदतीचं आश्वासन मुख्यमंंत्र्यांनी दिले होते. पण ते काय आता दिवाळीआधी प्रत्यक्षात उतरणार नाही. या सगळ्यानंतर हताश झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे अजबच मागणी केली आहे.
मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही शेतकऱ्याला दिलेला शब्द आठवतोय का. दहा दिवसांत हा शब्द विसरलात ?... दिवाळी तोंडावर आली आहे. कुठे आहे मदतीचा जीआर. कधी निघणार. अंमलबजावणी कधी होणार? शेवटी शेतकऱ्याची दिवाळी कडूच जाणार. तुमचे मंत्री म्हणतात शेतकऱ्यांच्या मदतीचा जीआर विधानपरिषद निवडणुकीमुळे अडकला. याबाबत तसे स्पष्टीकरण मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
सणाच्या तोंडावर शेतकऱ्याच्या घरात अन्नधान्य नाही.... मदत द्यायला जमत नसेल तर विषाची बाटली पाठवून द्या, असं आता शेतकरी म्हणतोय. आम्ही जगायचे कसे. सगळे हातचे गेले आहे. काय खायचे, असे विचार मदत करायची नसेल तर विषाची तरी बाटली द्या, असा टाहो शेतकरी फोडत आहे.
२३ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला. विधानपरिषदेची निवडणूक २ नोव्हेंबरला जाहीर झाली. दहा दिवसांत जीआर का काढला नाही? मातोश्रीवरची दिवाळी झगमगाटात होईल. शेतकऱ्याच्य़ा दिवाळीचं काय, सांगा तुम्हीच, असा सवाल विचारण्यात येत आहे.