शशिकांत पाटील / लातूर : एमपीएससी परिक्षेवरून मराठा समाजात उघड उघड दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत तोपर्यंत एमपीएससी परीक्षा घेऊ नये, अशी मागणी करीत ११ ऑक्टोबरला होणारी एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या एका गटाने मुंबईतील बैठकीत घेतली होती. मात्र आता या भूमिकेला अखिल भारतीय छावा संघटनेने विरोध करीत परीक्षा वेळेतच घेण्याची मागणी केली आहे.
एमपीएससी परीक्षेची तयारी ही मराठा विद्यार्थ्यांसह इतरही जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. जर एमपीएससी परीक्षेला विरोध केला तर गेल्या अनेक दिवसांपासून तयारी केलेल्या विद्यार्थ्यांचे यात नुकसान होऊ शकतं किंवा अनेक जण 'ऐज बार' ही होतील. त्यामुळे आतापर्यंत मोठ्या भावाच्या भूमिकेत असणाऱ्या मराठा समाजाने संकुचित भूमिका न घेता ११ ऑक्टोबरची परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्याची मागणी छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी घेतली आहे.
तर दुसरीकडे नोकर भरतीला छावा संघटनेचा विरोध असल्याचे ही स्पष्ट केलं आहे. दरम्यान यामुळे मराठा समाजात दोन गट पडले नसून इतर समाजाच्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच मराठा समाजाने ही भूमिका घेतल्याचेही अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा तुळजापूर येथून आंदोलनाचे नवे पर्व सुरू करणार अशी घोषणा औरंगाबादेत करण्यात आली. जागरण गोंधळ घालत सरकारला आरक्षणाबाबत जाब विचारण्यात येणार आहे.
कोपर्डी येथे राज्यव्यापी बैठक घेण्यात येईल. या बैठकीत राज्यातील सर्व समन्वयक एकाच व्यासपीठावर दिसतील. मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत एमपीएससी परीक्षा घेऊ नये असा इशारा दिला असताना परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षा उधळणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा समनव्यक रमेश केरे पाटील यांनी दिला.