औरंगाबाद: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला १०० जागाही मिळणार नाहीत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते गुरुवारी औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यशाळेत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल. काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे काही जणांना पिसं आली आहेत. ते सध्या हवेत उडत आहेत. मात्र, त्यांना लोकसभा निवडणुकीत १०० जागादेखील मिळणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले. या विधानसभा निवडणुकांच्या काळात झालेल्या सर्वेक्षणांवरून ही बाब समोर आली आहे. विधानसभेसाठी नागरिक भाजप किंवा काँग्रेस अशा दोन पर्यायांचा विचार करत होते. मात्र, लोकसभेला नरेंद्र मोदींनाच मत देऊ, असे प्रत्येकाची भूमिका असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
यावेळी फडणवीस यांनी राफेल विमान व्यवहारावरून आरोपांची राळ उठवणाऱ्या राहुल गांधी यांचाही समाचार घेतला. गेल्या साडेचार वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक कामं केली. मात्र, काँग्रेसने केवळ आरोप केले. गेल्या काही महिन्यांपासून राफेल करारावरून राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांची भूमिका केवळ खोटं बोल पण रेटून बोल, अशाप्रकारची आहे. काँग्रेसच्या काळात गांधी घराण्याला हवा असलेला मध्यस्थ नसल्यामुळे राफेल विमानांची खरेदी होऊ शकली नाही. मात्र, मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चीन आणि पाकिस्तान यांच्यापासून असलेला धोका लक्षात घेऊन लगेच फ्रान्स सरकारशी खरेदी करार केला. तसेच या करारानुसार रिलायन्स कंपनीला फारतर ६०० ते ७०० कोटींचे काम मिळेल. मात्र, राहुल गांधी अंबानी यांना १ लाख ३० हजार कोटींचा फायदा होणार असल्याचा अपप्रचार करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.