चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, शहापूर : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण.. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रथा परंपराच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात.
संस्कृतीच्या नावाखाली त्या गावागावात समर्थनीय असतील पण त्यानिमित्ताने होत असलेले घाव, आणि बसणारे चटके मात्र प्रथांबद्दल चिंतनीय बनतायत.
दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचा सोहळा रंगलेला असताना, मात्र काही ठिकाणच्या प्रथा परंपरामुळे प्रकाशाची काजळीच जास्त ठळक झाल्याचे चित्र यंदा अधोरेखित होते.. कुठे माणसांवर घाव तर कुठे आगीना चटके यामुळे यासर्व प्रकारावर आता गंभीर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बलिप्रतिपदेच्या निमित्ताने ग्रामीण परिसरातील दिवाळीची आगळी वेगळी परंपरागत चालत आलेली प्रथा कल्याण तालुक्यातील गावांमध्ये पाहायला मिळते. शेतात राबणाऱ्या गुरा-ढोरांना बलिप्रतिपदेला स्नान घालून त्यांना सजविण्यात येते. त्यानंतर गाई-गुरांचे यथेच्छ पूजन करून त्यांना पेटत्या आगीवरून चालवितात.
वर्षभर या गाई-गुरांना कुठल्याही प्रकारची बाधा अथवा आजार होऊन नये, ही ग्रामीण जनतेची आणि शेतकरी वर्गाची भावना आहेगावकरी या प्रथा परंपरा मनोभावे पार पाडतात आणि जनावरांना कुठलीही इजा होत नसल्याने त्यांचं समर्थनही करताना दिसून येतात..
शहापुर तालुक्यातील डोळखांब भागातील बोंद्रेपाडा येथे बलिप्रतिपदा दीपावली उत्सव साजरी करण्याची विचित्र प्रथा आहे . गावकरी कुलदैवतेला प्रसन्न करण्या साठी तलवारीने स्वताच्या डोक्यावर छेद करून रक्तबंबाळ होतात अश्या विचित्र पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येते.
भक्ताळु ग्रामस्थ गावात असलेल्या शिवकालीन तलवारीने स्वताच्या डोक्यावर छेद करून रक्तबंबाळ होतात आणि काठीला रक्त वाहतात. ही अशी बोंद्रेपाड्यातील श्रद्धाळू आणि अनोखी परंपरा गेली अनेक वर्षापासून चालू आहे.
या दिवशी रक्तबंबाळ झालेल्या भक्तांच्या जखमेवर ते स्वता पाणी ओततात. त्या नंतर त्यांना कुठलेही उपचार न करता त्यांच्या डोक्यावरची जखम देखील बरी होते अशी गावक-यांची श्रद्धा आहे.
पण संस्कृतीच्या आड कितीही या प्रथांचे समर्थन केले तरी त्यातील प्राण्यांना चटके आणि माणसांचे घाव नक्कीच आनंददायी नाही हे सर्वांनीच स्वीकाराय़ला हवे.