Devendra Fadnavis On Sanjay Raut Ayodhya Ram Mandir Comment: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. संजय राऊत यांनी अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेलं राम मंदिर हे वादग्रस्त जागेवर न बांधताना तिथून 4 किलोमीटरवर बांधलं असल्याचा दावा पत्रकारांशी बोलातना केला. यावर फडणवीस यांना पत्रकारांनी मुंबादेवी मंदिराबाहेर प्रश्न विचारला असताना त्यांनी सूचक शब्दांमध्ये संजय राऊतांवर निशाणा साधला.
संजय राऊत यांनी भाजपाने वादग्रस्त जागेपासून 4 किलोमीटर दूर मंदिर बांधल्याचा दावा पत्रकरांशी बोलताना केला. "भाजपाचा नारा काय होता त्यावेळेला? मंदिर वही बनाऐंगे. जाऊन पाहा मंदिर कुठे उभारलं आहे. जिथे आश्वासन देण्यात आलं होतं तिथे मंदिर उभारण्यात आलेलं नाही. तिथून चार किलोमीटर दूर मंदिर उभारण्यात आलं आहे. ते कोणीही बनवू शकलं असतं. मात्र आम्हाला त्यात भेदभाव करायचा नाही. तरीही जिथे मंदिर बनवण्यासंदर्भात सांगितलं गेलं तिथे मंदिर उभारलेलं नाही. ती वादग्रस्त जागा आजही तशीच आहे," असं राऊत म्हणाले.
याचसंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. "मंदिर वही बनाऐंगे असा भाजपा नारा होता मात्र ठरलेल्या जागेपासून 4 किलोमीटरवर राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. याकडे आपण कसं पाहता?" असा प्रश्न फडणवीस यांना एका पत्रकाराने विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, " ज्यांचं या आंदोलनात काहीही योगदान नाही असे लोक अशाप्रकारेचे आरोप करुन स्वत:चं हसं करुन घेत आहेत आणि कोट्यवधी हिंदूचा अपमान करत आहेत. आता तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अशाप्रकारे हिंदूंचा अपमान करणं बंद करावं," असं उत्तर दिलं.
तसेच फडणवीस यांनी पुढे बोलताना, "आयुष्यात मी एक गोष्ट पाळतो की, मी मुर्खांना उत्तरं देत नाही. मात्र मी इतकं सांगेन की देशातील हिंदूंचा अपमान बंद करा. तुमचं रामजन्मभूमी आंदोलनात कोणतेही योगदान नाही," असा टोला राऊत यांना लगावला.
मुंबादेवी मंदिरातील स्वच्छतेसंदर्भातही फडणवीस यांनी भाष्य केलं. मोदीजींनी सर्वांनाच आवाहन केलं आहे की आपआपली श्रद्धास्थानं स्वच्छ ठेवावीत. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन करतोय रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना करतोय त्या वेळेस देशातील सर्व मंदिरं स्वच्छ हवीत. त्याचनिमित्ताने आम्ही मुंबईची आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या मुंबादेवी मंदिरात आलो होतो. आम्ही प्रतिकात्मक रुपाने स्वच्छता केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता सुरु आहे. स्वच्छता करताना वेगळा आनंद, अनुभूती प्राप्त झाली. केवळ स्वच्छता नसून मनाला देखील चांगलं वाटतं. ज्या श्रद्धेनं आपलं जातो तिथे स्वच्छता असेल तर ती नक्कीच वृद्धंगित होते, असं फडणवीस म्हणाले.