Inspirational Success Story Of Mumbaikar: 'इच्छा तिथे मार्ग' अशी मराठीत एक म्हण आहे. या म्हणीचं मूर्तीमंत उदाहरण पहायचं असेल तर तुम्ही एकदा मुंबईतील ओशिवरा इथे राहणाऱ्या अश्फाक चुनावाला या 37 वर्षीय व्यक्तीला भेटलं पाहिजे. इच्छाशक्ती, कष्ट अन् योग्य आर्थिक नियोजनाच्या जोरावर माणूस काय करु शकतो हे अश्फाकने दाखवून दिलं आहे. एकेकाळी महिना दीड हजार कमवणारी ही व्यक्ती आता वर्षाला 36 कोटी म्हणजेच महिन्याला 3 कोटी रुपयांची कमाई करते असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. 2004 ते 2024 या 20 वर्षांच्या कालावधीत या व्यक्तीने एवढी प्रगती केली आहे. आथा तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं हा नेमकं करतो तरी काय?
तर अश्फाक हा तब्बल 400 गाड्यांचा मालक आहे. एकेकाळी किराणा मालाच्या दुकानात काम करणारा अश्फाक आज कोट्यवधींचा मालक आहे. मात्र अजूनही त्याची भूक भागलेली नसून त्याला आपल्याकडील गाड्यांची संख्या 500 पर्यंत वाढवायची आहे. इयत्ता दहावीमध्ये शिक्षण सोडून दिलेल्या अश्फाकने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी 2004 मध्ये एका किरणामालाच्या दुकानात 1500 रुपये महिना रोजंदारीवर मदतनीस म्हणून नोकरी सुरु केली. पुढील 10 वर्ष तो सतत नोकऱ्या बदल राहिला.
कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने अश्फाक धडपडत होता. त्याला एकेठिकाणी कापडाच्या दुकानामध्ये मॅनेजर पदावर नोकरी मिळाली. मात्र त्याला या नोकरीमधून समाधान मिळत नव्हतं. आपण आर्थिक संकटात अडकू याची चाहूल लागल्याने अश्फाकने अधिक काय वेगळं करता येईळ याचा विचार केला. त्याचं नशीब पालटलं ते 2013 मध्ये जेव्हा त्याने टॅक्सी सेवा पुरवाणाऱ्या एका अॅपची जाहिरात पाहिली. त्याने अतिरिक्त कमाई म्हणून टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला. त्याने पार्ट टाइम चालक म्हणून इथे रुजू झाला. त्याने या कंपनीच्या योजनेतूनच एक छोटी कार घेतली. तो सकाळी काही तास आणि रात्री काही तास कार चालवायचा. मधल्या वेळेत नोकरी करायचा. त्याला नोकरीमधून 35 हजार आणि या कार चालवण्याच्या पार्ट टाइम जॉबमधून 15 हजार असे एकूण 50 हजार महिना मिळू लागले.
दरम्यान, अश्फाकने हे पैसे बाजूला ठेवलेले असतानाच त्याच्या बहिणीने त्याला या पैशांमध्ये अधिक भर टाकून दुसरी कार घेण्यास मदत केली. दोन कारच्या मदतीने कमाई वाढल्यानंतर अश्फाकने अजून कार विकत घेतल्या पाहिजे असा विचार केला आणि बँकेकडे 10 लाखांच्या कर्जासाठी अर्ज केला. त्याचं कर्ज मंजूर झालं ज्यातून त्याने 3 नव्या कार घेऊन ड्रायव्हर कामावर ठेवले. कमाई वाढल्यानंतरही तो अतिरिक्त कमाई बाजूला काढून ठेवायचा. कर्जाचे हफ्ते फेडून उरलेले पैसे तो गुंतवत राहिला. त्याने कर्ज फेडून नवं घेऊन पुन्हा ते फेडून असं करत करत तब्बल 400 कार्स विकत घेतल्या. "मला माझ्याकडे काम करणाऱ्या चालकांची प्रगती झाल्याचं पाहायचं आहे. त्यांनाही आर्थिक स्थैर्य मिळालं पाहिजे," असं अश्फाकने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.