नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मृत्यू कुणाला कधी आणि कुठे गाठेल याचा काही नेम नाही. जालना तालुक्यातील सामनगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीने मालकांच्या दोन मुलांसह स्वत:चा मुलगाही गमावला. शेवटी त्याला देखील मृत्यूने गाठले. शेततळ्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांसह एका व्यक्तीचा समावेश आहे. शेत तळ्यात बुडून यांचा मृत्यू झाला आहे (Jalna Crime News).
ओमकार कृष्णा पडूळ (वय 6 वर्ष), भागवत कृष्णा पडूळ (वय 9 वर्ष), युवराज भागवत इंगळे ( वय 5 वर्ष) आणि भागवत जगन्नाथ( वय 32 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
भागवत जगन्नाथ इंगळे हा शेततळ्यात मालकाची दोन मुलं आणि त्याचा एक मुलगा घेऊन शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी मुलं पाण्यात बुडू लागली त्यांना वाचवण्यासाठी भागवत गेले असता त्यांचाही त्यात बुडून मृत्यू झाला. घटना घडताच ग्रामस्थांनी पोलीस आणि अग्निशनमन दलाला याची माहिती दिली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहरे काढले. चौघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.
या दुर्दैवी घटनेनंतर गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी उन्हाळा तीव्र असल्यानं उकाड्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या अधून मधून पाऊस होत असल्यानं उकाडा आणखीचं वाढला आहे. त्यामुळे भागवत इंगळे हा त्याच्या मालकांच्या दोन मुलासह स्वतःच्या मुलाला पोहण्यासाठी घेऊन गेला होता. यावेळी ही घटना घडली. भागवत इंगळे हा कृष्णा पडुळ यांच्याकडे शेतात कामाला होता.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील धानोरा वैद्य येथे विहिरीत पोहायला गेलेल्या युवकाचा गाळात अडकल्याने मृत्यू झाला आहे. हा युवक आपल्या मित्रांसह शेतात असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. पोहतांना हा तरुण अचानक गाळात अडकला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.