Sanjay Raut Slams Raj Thackeray: राज्यसभेचे खासदार तसेच उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील प्रचारसभांवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींवर टीका करतानाच संजय राऊत यांनी गुढीपाडव्याच्या पक्षाच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधाला आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार गटाच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर आज मुंबईमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्याआधीच राऊत यांनी राज ठाकरेंवर त्यांच्या या भूमिकेवरुन टोला लगावला आहे.
"पंतप्रधानपदाचा सर्व लवाजमा घेऊन मोदी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रचार सभा घेत आहेत. मोदी यांनी महाराष्ट्रात यायला काहीच हरकत नाही, पण आचारसंहिता लागू असताना पंतप्रधानपदाच्या सुविधांचा वापर करणे हे नियमात बसत नाही. टी. एन. शेषन यांच्या काळात मोदी यांनी हे वर्तन केले असते तर शेषन यांनी मोदींवर कायद्याचा बडगा उगारला असता," असं संजय राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरातील लेखात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या हातातील शस्त्र काढून घेतल्यानंतर लढाईसाठी सज्ज असल्याचं दाखवत असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. "देशात लोकसभा निवडणूक विषम पातळीवर लढवली जात आहे. भाजपकडे एका बाजूला प्रचंड साधन संपत्ती, सरकारी यंत्रणा, पोलीस, मीडियाचे बळ आहे, तर विरोधकांना काहीच मिळू नये यासाठी राज्यकर्ते सर्व पातळ्यावर प्रयत्न करीत आहेत. त्यांची बँक खातीही सरकारने सील केली. लढणाऱ्यांची सर्व शस्त्रे जबरदस्तीने काढून घ्यायची व मग “आता आम्हीच जिंकणार” असे जाहीर करायचे असे सध्या मोदी यांचे चालले आहे," असं राऊत म्हणाले.
चंद्रपूरमध्ये झालेल्या सभेचा उल्लेख करत शिवसेनेवरुन मोदींनी केलेल्या टीकेचा संदर्भत देत शिंदेंची शिवसेना हीच नकली असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. मोदींच्या महाराष्ट्रातील सभेंचा संदर्भ देत राऊत यांनी थेट राज ठाकरेंचा उल्लेख केला आहे. "मोदींनी महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले व आता ते लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी फिरत आहेत. या मोदी-शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, असे कडाडणारे राज ठाकरेही शेवटी अचानक मोदी भजन मंडळात सामील झाले," असा शाब्दिक चिमटा संजय राऊतांनी राज ठाकरेंना काढला आहे.
नक्की वाचा >> नव्या भूमिकेनंतर राज ठाकरेंना धक्का! मोठा नेता पक्ष सोडत म्हणाला, 'भाजपाबरोबर जाण्याने मराठी..'
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणांमुळे अनेक नेत्यांनी भाजपाला साथ दिल्याचा संदर्भ देत संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या पाठिंब्यामागेही असेच काहीसे कारण तर नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे. "अजित पवार, शिंदे, हसन मुश्रीफ, वायकर, यशवंत जाधव, तटकरे वगैरे मंडळी ज्या कारणांसाठी मोदी भजन मंडळात सामील झाली, त्याच कारणासाठी राज ठाकरेही गेले काय? हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही," असं राऊत यांनी म्हटलं आहे. "कोणी कोणत्या पक्षाबरोबर जावे हा त्यांचा प्रश्न. व्यासपीठावरून महाराष्ट्र स्वाभिमानाच्या व महाराष्ट्रावरील अन्यायाच्या गर्जना करायच्या व ज्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केलाय त्यांच्याच पालख्या उचलायच्या, हे रहस्यमय आहे. अजित पवार यांना मोदी हे देवाचे अवतार वाटू लागले, इथपर्यंत या भजन मंडळाच्या बुद्धीचे अधःपतन झाले. त्या भजनात आता नमोनिर्माणाचे टाळ वाजले," असा शाब्दिक टोला राऊत यांनी मनसेला लगावला आहे.