Sada Sarvankar Mahim Constituency: शिवसेनेने माहीममधून सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, भाजपा मात्र त्यांनी माघार घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी माहीम मतदारसंघातून (Mahim Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची बिनविरोध निवड व्हावी अशी भाजपाची अपेक्षा आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी हे जाहीरपणे बोलूनही दाखवलं आहे. मनसेने लोकसभेत दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करावी अशी महायुतीची अपेक्षा आहे. मात्र सदा सरवणकर अजिबात माघार घेण्याच्या भूमिकेत नाही. 'झी 24' ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे बोलून दाखवलं.
मनसेने लोकसभेत महायुतीला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात तुमचा बळी दिला जात आहे का? असं विचारलं असता सदा सरवणकर यांनी अजिबात नाही असं उत्तर दिलं. ते म्हणाले की, "निवडणूक ही मतदारांच्या अपेक्षांवर अवलंबून असते. प्रत्येक मतदाराला आपल्याला सहज भेटणारा, विकासाचा दृष्टीकोन ठेवणारा, आपल्यातील एक उमेदवार, आमदार असावा असं वाटतं. मतदारांचा मी उभं राहायला हवं आणि निवडून यायला हवं असा निश्चय आहे".
तुम्ही माघार घेण्यासंदर्भातील चर्चा का रंगल्या आहेत असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "माध्यमांमधून जास्त चर्चे ऐकू येत आहे. आमच्या तोंडून, कार्यकर्त्याकडून असं काही ऐकायला मिळणार नाही. आपल्याला निवडणूक लढवायची आहे आणि दादर, माहीम, प्रभादेवाचा आमदार म्हणून विधानसभेत जायचं आहे, लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. ही लोकभावना आहे, म्हणून मला लोकांखातर, पदाधिकाऱ्यांसाठी लढायचं आहे".
"यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. चर्चेला स्वातंत्र्य आहे, तुम्ही चर्चा करु शकता. पण निर्धार मतदार, पदाधिकारी, शाखाप्रमुख, कार्यकर्ते यांचा आहे. माझ्याशी यासंदर्भात कोणी काही बोललेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी मला एबी फॉर्म दिला, निवडणुकीसाठी आवश्यक साहित दिलं. यापेक्षा आणखी काय बोलायला हवं," असंही सदा सरवणकर म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंनी विनंती केली तर तुम्ही माघार घेणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, "माझ्या थांबण्याचा प्रश्न नाही. मतदार काय बोलतो हे महत्वाचं आहे. आमचे पदधिकारी यांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत. येथे शिवसेना प्रमुखांचे विचार महत्वाचे आहेत. हे विचार सोडून कोणी आग्रह करेल असं वाटत नाही. अर्ज भरणार आहोत, माघार कशाला घ्यावी".