Third Alliance In Maharashtra : विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपतींनी पुढाकार घेत महाराष्ट्रात नवी आघाडी निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्यात..
मुंबईत संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात महत्त्वाची बैठक होऊन नव्या आघाडीच्या दृष्टीनं चर्चा झालीय.. या दोघांनी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्यासह राज्यातील छोट्या पक्षांना सोबत घेत नव्या आघाडीच्या स्थापनेचा निर्णय घेतलाय..
गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती हे विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेत महाराष्ट्रात एक चांगला पर्याय देण्याच्या तयारीत आहेत.. मनोज जरांगे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याही संभाजीराजेंनी भेटी घेतल्या होत्या. संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आहे. मध्यंतरी संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील विविध भागात दौरा सुद्धा केला होता. संभाजीराजेंशी महाराष्ट्रातील तरूणवर्ग मोठ्या प्रमाणत जोडलेला आहे. तर बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात..ते शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सतत आवाज उठवत असतात..
बच्चू कडू यांचा विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला प्रभाव आहे तर संभाजीराजे छत्रपतींचा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात... भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत राज्यभरातील दलित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे..
सध्याच्या राजकीय परिस्थितीत संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर हे तीन नेते एकत्र आल्यास आगामी निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळेल. शिवाय आघाडी आणि युतीतील नाराज लहान पक्ष आणि संघटना या नव्या आघाडीत सहभागी होऊ शकतात.. त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय..
एकीकडे महायुतीचे घटक पक्ष, दुसरीकडे महाविकास आघाडी... तर आता बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र निवडणूक लढवून महाराष्ट्राच्या जनतेपुढे नवा पर्याय निर्माण करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? आणि यांच्या नव्या आघाडीमुळे कुणाचं टेन्शन वाढतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरणाराय..