देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : राज्यातील बरेचसे पक्ष हे सध्या दोन गटात विभागल्याचे दिसत आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये राज्यातील महत्त्वाचे पक्ष सामील झाले आहेत. दुसरीकडे काही महिन्यांपासून मनसे (MNS) आणि भाजपाची (BJP) युती होईल, असं बोललं जात होतं. अशातच भाजपने मनसेला युतीचा ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याचे म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या काळात येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे. वांद्रे एमआयजी क्लब येथे ही बैठक पार पडली. मनसे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी यांना राज ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. यावेळी भाजपने मनसेला दिलेल्या युतीच्या ऑफरबाबत चर्चा झाल्याचे म्हटलं जात आहे. भाजप आणि मनसेमध्ये हातमिळवणी होणार अशी चर्चा सातत्याने सुरु आहेत. त्यामुळे आता भाजपच्या या ऑफरबाबत नक्की काय चर्चा झाली याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती मिळत आहे.
बैठकीत काय झालं?
बैठकीनंतर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. "आजची बैठक आगामी लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडुकांसंदर्भात होती. पालिका निवडणुका यावर्षी होतील असं वातावरण मला दिसत नाही. महाराष्ट्रात जो काही राजकीय घोळ सुरु आहे, तो पाहता पालिकेच्या निवडणुका जाहीर करतील आणि धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकाच होतील. त्याच पार्श्वभूमीवर सर्व मतदारसंघांची चाचपणी होईल. प्रत्येक मतदारसंघात आमच्या टीम जातील आणि त्यादृष्टीने काम करतील. तिथे काय काम करायचं हे सांगितलं आहे. जी लोकं पाठवायची आहेत. त्यांच्यासाठी ही बैठक होती. उद्या त्यांच्या हातात संपूर्ण कार्यक्रम असेल. त्याप्रमाणे ते आपापल्या मतदारसंघात रुजू होतील," अशी माहिती राज ठाकरे यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली.
मनसेचा 'एकला चलो रे'चा नारा?
"तुम्हाला काय वदवून घ्यायचं आहे. परिस्थितीनुसार गोष्टी ठरतात. आता तर तुम्हाला सवयही झाली आहे. दोन दिवासंपूर्वी काय बोललं जातं आणि नंतर काय होतं हे सर्वांना माहिती आहे. पण महाराष्ट्राची जास्तीत जास्त प्रताडणा होणार नाही याची जास्त याची काळजी घेतली आहे. आधीही घेत होता आणि घेत राहू," असेही स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलं.