राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर

 राज्यात आज ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

Updated: Nov 5, 2020, 08:19 PM IST
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर  title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात आज ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०७ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेचे दोन्ही टप्पे पूर्ण झाले असून डिसेंबरमध्ये परत एकदा ही मोहीम राबवावी म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले. या मोहिमेमुळे ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले, असे ते म्हणालेत.

आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,०३,४४४ झाली आहे. आज मृत्यू रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेमुळे काही जिल्हे आणि मनपाच्या प्रगतीपर मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. ही वाढ कोल्हापूर -२६, कोल्हापूर मनपा -१०, सोलापूर - २९, सांगली -५१ आणि नांदेड -२३ अशी आहे.  त्यामुळे राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत १३९ ने वाढ झाली आहे.

देशात ५० हजार २०९ नव्या रुग्णांची नोंद

दरम्यान, देशात कोरोनाच्या ५० हजार २०९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात सध्या ८३ लाख ६४ हजार ०८६ कोरोनाग्रस्त आहेत. गेल्या २४ तासांत ७०४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत एकूण १ लाख २४ हजार ३१५ जणांचा बळी गेला आहे. 

कोरोनावर आतापर्यंत ७७ लाख ११ हजार ८०९ जणांनी मात केलीय. देशात सध्या ५ लाख २७ हजार ९६२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. देशाचा रिकवरी रेट ९२.२० टक्के तर मृत्यू दर १.४८ टक्के इतका आहे.