Maharashtra Weather Updates on 14th February 2025 : महाराष्ट्रात मागील 48 तासांमध्ये बहुतांश भागांच्या किमान तापमानात घट झाली आणि राज्यात पुन्हा एकदा थंडीचं पुनरागमन झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं. मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकण पट्टा आणि उत्तर महाराष्ट्रात असणाऱ्या निफाडमध्ये पारा खाली आल्यामुळं पुन्हा एकदा थंडी जोर धरताना दिसली. पण, हवमानात सातत्यानं होणारे बदल इथंही त्यांचं खरं रूप दाखवून गेले.
एकिकडे शीतलहरींनी पुन्हा एकदा थंडीची चाहूल दिलेली असतानाच काही तासांचा गारठा वगळता उर्वरित दिवसभरात उकाड्यानं कोणाचीच पाठ सोडलेली दिसत नाही. उत्तर महाराष्ट्रापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, सोलापूर इथं राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. जिथं हा आकडा 37.3 अंश असल्याचं पाहायला मिळालं, तर निफाडमध्ये किमान तापमान 7 ते 9 अंशांदरम्यान पाहायला मिळालं.
सातारा, कोल्हापूरसह विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा इथंही पारा 35 अंशांहून अधिकच्या आकड्यावर स्थिरावल्यानं कमाल आणि किमान तापमानामध्ये साधारण 25 ते 27 अंशांची तफावत पाहायला मिळत आहे. हा उष्मा येत्या दिवसात आणखी वाढणार असून, परिणामस्वरुप उन्हाळा नेमका किती तीव्र असेल याचीच ही रंगीत तालीम आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.